मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या चिथावणीखोर भाषणाचं समर्थन केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) पोस्ट तपासून राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करावी तसंच सोनी वाहिनीने या पोस्टची दखल घेऊन त्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून काढावं, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली. सरळ सांगून भोंगे (Loudspeaker) निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या एकदा, अशी आक्रमक भाषा वापरत औरंगाबाद इथल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली. 3 मेपर्यंत मी वाट बघणार, पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ द्या, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यांच्या या विधानानंतर प्राजक्ताने ‘आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते’, अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. मात्र थोड्या वेळानंतर तिने तिची ही पोस्ट एडिट केली.
“राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेत चिथावणीखोर भाषण केलं. तरीसुद्धा प्राजक्ता माळी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं आहे. प्राजक्ता माळीजी आपण क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे शिक्षण घेतलं आणि आज लोकप्रिय कलाकार झालात. परंतु आपण पोस्टमध्ये म्हणता आपल्याला राज ठाकरे यांचं भाषण पाहून अंगावर स्पुरण चढलंय आणि 3 तारखेला गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते अशी पोस्ट लिहली आहे. त्यामुळे ही पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर करावी. तसंच सोनी चॅनेलने या पोस्टची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रममधून काढावं,” खरात यांनी केली.
‘सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसंच मुस्लीम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.) असो, आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे सगळ्याचसाठी. परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खूप धन्यवाद’ अशी पोस्ट तिने लिहिली. त्याचसोबत #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक हे हॅशटॅग तिने वापरले होते. मात्र काही वेळानंतर तिने तिची ही पोस्ट एडिट केली. फक्त शुभेच्छा देणारा मजकूर ठेवत तिने बाकी सर्व डिलिट केलं. इतकंच नव्हे तर या पोस्टवरील कमेंट्स तिने बंद केले. त्यामुळे नेटकरी त्यावर व्यक्त होऊ शकत नाहीत.