मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटातील इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी तिने तिचा 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम मोडला. बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत तिने यामध्ये भूमिका साकारली आहे. मात्र तमन्नाच्या इंटिमेट सीन्सवरून नेटकऱ्यांकडून जोरदार टीका झाली. ‘इतकी वर्षे असे सीन्स केले नाहीत, मग आता काय गरज होती’, असा सवाल काहींनी केला. या टीकांवर आता तमन्नाने उत्तर दिलं आहे. पडद्यावर इंटिमेट सीन्स शूट करताच अभिनेत्रींच्या नैतिकतेवर लगेच प्रश्न उपस्थित केला जातो, मात्र त्याहून वाईट करूनही अभिनेते सुपरस्टार बनतात, अशी खंत तिने यावेळी व्यक्त केली.
“स्त्रीयांचा द्वेष करणारे कमेंट्स अत्यंत वाईट आहेत. 2023 पर्यंत अशी वेळ येणार नाही असं मला वाटलं होतं. पण यावेळी उलट ते आणखी तीव्रपणे मला जाणवतंय. मी जेव्हा अभिनयाला सुरुवात केली होती, तेव्हा मी खूप लहान होते. त्यावेळी मी डान्स आणि ग्लॅमरस दिसण्यावर अधिक भर दिला होता. त्यामुळे असं नाही की माझी नॉन ग्लॅमरस प्रतिमा होती आणि आता ती अचानक काहीतरी वेगळी झाली आहे. मला फक्त हे विचित्र वाटतं की 2023 मध्येही अभिनेत्रींना अशा टिप्पणींना का सामोरं जावं लागतं? जसं की तिने इंटिमेट सीन्स केले तर तिच्यावर टीका केली जाते”, असं तमन्ना म्हणाली.
“मी बऱ्याच पुरुषांना हे सर्व अत्यंत सहजपणे आणि अनेकदा करताना पाहिलंय. त्यांनी अपमानास्पद भूमिका साकारल्या आहेत, पडद्यावर हिंसा साकारली आहे आणि कदाचित ज्या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत, त्या त्यांनी केल्या आहेत. पण तरीही ते सुपरस्टार बनले आहेत. पण अभिनेत्रीने असं काही केलं तर ती वाईट ठरते. याला काही अर्थ नाही. मी या गोष्टी समजूच शकत नाही”, असंही ती पुढे म्हणाली.
कम्फर्ट झोनमधून राहून एकानंतर एक हिट चित्रपट करता आले असते, मात्र हा सर्वांत सोपा मार्ग असतो. एक कलाकार म्हणून मला स्वत:ची प्रगती करायची होती, म्हणून मी यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, असं स्पष्टीकरण तमन्नाने तिच्या इंटिमेट सीन्सबद्दल दिलं. त्याचवेळी या भूमिकेमुळे होणाऱ्या टिका-टिप्पण्यांकडे ती बारकाईने लक्षही देत आहे. “मी बरेच कमेंट्स वाचले आहेत. असे सीन्स करायची हिला काय गरज आहे, असं काहींनी म्हटलंय. मला हे खरंच विचित्र वाटतं, कारण उद्या जर मी सीरिअल किलरची भूमिका साकारली, तर मी खरंच तशी वाईट व्यक्ती होईन का”, असा सवाल तिने केला.