‘चॉकलेट बॉय’ साकारणार चौकटी पलिकडची भूमिका; म्हणाला, आजवर कधीच…
Actor Swapnil Joshi New Movie Jilabi : अभिनेता स्वप्नील जोशी याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जिलबी' हा स्वप्नीलचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाक आहे. या सिनेमात स्वप्नील वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. वाचा स्वप्नील जोशीच्या भूमिकेविषयी...
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि ‘चॉकलेट हिरो’ अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी… स्वप्नील कायमच ‘ रोमॅन्टिक हिरो’ ‘चॉकलेट बॉय’ च्या भूमिकेत दिसला. पण आता तो ‘चॉकलेट बॉय’ या चौकटीच्या पलिकडची भूमिका साकारणार आहे. स्वप्नीलचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जिलबी’ या आगामी चित्रपटात स्वप्निल डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका त्याच्या आधीच्या सिनेमांतील भूमिकांपेक्षा वेगळी आहे. या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर स्वप्नील जोशी आता आगामी ‘जिलबी’या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बेधडक डॅशिंग भूमिकेत स्वप्निल लवकरच पहायला मिळणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ 17 जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे.
आधीच्या सिनेमांपेक्षा वेगळी भूमिका साकारताना स्वप्निल जोशी याला वेगळा अनुभव आला. या सिनेमातील भूमिकेविषयी स्वप्निलने प्रतिक्रिया दिली. आपला पोलिसी खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज, त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली, असं स्वप्निलने म्हटलं.
प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका केली, असं स्वप्निलने सांगितलं.
स्वादिष्ट जिलबी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असते.‘जिलबी’ हा चित्रपटसुद्धा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपल्याला देणार आहे, ज्यात विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोबत रहस्याचा थरार असं बरंच काही आहे. ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.