अक्षया देवधर पुन्हा दिसणार मराठी मालिकेत; ‘या’ कलाकारांसोबत दिसणार छोट्या पडद्यावर
Actress Akshaya Deodhar New Serial : अभिनेत्री अक्षया देवधर पुन्हा एकदा मराठी मालिकेत दिसणार आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्गज कलाकारांसोबत ती पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. कोणती आहे ही मालिका? कधी येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला? वाचा सविस्तर...
झी मराठीवरच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर… या मालिकेनंतर बऱ्या मोठ्या ब्रेकनंतर अक्षया आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. झी मराठीवर ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षया पुन्हा एकदा झळकणार आहे. या टिझर प्रसारित झाला आहे. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता तुषार दळवी हे दोन दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या मालिकेच्या टिझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेगळी कथा असणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अक्षया देवधरचं दमदार कमबॅक
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर हिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अक्षयाने साकारलेली अंजली पाठक ही भूमिका प्रेक्षकांना भावली होती. 2016 ते 2021 तब्बल पाच वर्षे ही मालिका सुरु होती. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर अक्षया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षयाची भूमिका काय असेल? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
View this post on Instagram
‘लक्ष्मी निवास’ मालिकेची गोष्ट काय?
‘लक्ष्मी निवास’ ही कथा आहे, स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची…. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. 3 मुलं, 3 मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे. या मालिकेचं लेखन सायली केदारने केलं आहे. तर मालिकेचे निर्माते सोमिल क्रिएशनचे सुनील भोसले आहेत.