मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर आज (19 सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजता होणार आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात कोण दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक असताना काही संभाव्य स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.
सोनाली पाटील – टिकटॉक गर्ल म्हणून सोनाली पाटीलने ओळख मिळवली होती. कोल्हापूरच्या सोनालीने ‘वैजू नंबर वन’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेतील अॅडव्होकेटच्या भूमिकेमुळे सोनालीला नव्याने ओळख मिळाली.
सुरेखा कुडची – लावणी क्वीन म्हणून सुरेखा कुडची यांची ओळख आहे. सासूची माया, पोलिसाची बायको, भरत आला परत, फॉरेनची पाटलीण यासारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय देवयानी, रुंजी, नवरी मिळे नवऱ्याला, चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांतही त्यांनी काम केलं आहे. नुकतंच स्वाभिमान या मालिकेतून त्यांनी एक्झिट घेतल्यानंतर त्या बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता वाढली.
स्नेहा वाघ – अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला यासारख्या मालिकांतून स्नेहा वाघने लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ज्योती मालिकेतून स्नेहाने हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. एक वीर की अरदास.. वीरा, शेर ए पंजाब – महाराजा रणजीत सिंह, चंद्रशेख, बिट्टी बिजनेस वाली, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्या, कहत हनुमान जय श्री राम यासारख्या अनेक मालिकांमधून तिने नाव कमावलं.
चिन्मय उदगीरकर – स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून चिन्मयने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर नांदा सौख्यभरे, घाडगे अँड सून सारख्या मालिका त्याने केल्या. नुकताच तो अग्गंबाई सूनबाई मालिकेतही झळकला होता.
पल्लवी सुभाष – तिची मूळ नाव पल्लवी सुभाष शिर्के. चार दिवस सासूचे, अधुरी एक कहाणी यासारख्या मालिकेतून पल्लवी सुभाष झळकली होती. त्यानंतर हिंदीत जात तिने तुम्हारी दिशा, करम अपना अपना, कसम से, आठवा वचन, बसेरा, गोदभराई अशा अनेक मालिका केल्या. गुंतता हृदय हे या मालिकेतून तिने ग्लॅमरस भूमिकेत मराठीत पुनरागमन केलं होतं. असा मी अशी ती, प्रेमसूत्र, हॅपी जर्नी हे मराठी, विकी डोनर हा हिंदी, तर काही तेलुगू सिनेमातही तिने काम केलंय.
अक्षय वाघमारे – अक्षय वाघमारे हा कुख्यात डॉन अरुण गवळीचा जावई म्हणजेच योगिता गवळीचा नवरा. त्याने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होता.
याशिवाय अभिनेत्री अक्षया देवधर, नक्षत्रा मेढेकर, केतकी चितळे, नेहा जोशी, गायत्री दातार, दीप्ती देवी, पल्लवी पाटील, भाग्यश्री लिमये, अभिनेता आदिश वैद्य, विनोदी कलाकार अंशुमन विचारे, आगरी कोळी गीतांचे बादशाह संतोष चौधरी अशा अनेक जणांची नावं शोसाठी चर्चेत आहेत.
19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर झाल्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सिझनची थीम आहे.
संबंधित बातम्या :
Bigg Boss Marathi 3 | छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस सूनबाई दिसणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात?