‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा साधेपणा लोकांना भावतो. सूरजला आई- वडील नाहीत. पण जेव्हा केव्हा आई- वडिलांचा विषय निघतो. तेव्हा तेव्हा सूरज चव्हाण भावूक होतो. एका मुलाखतीमध्ये सूरज चव्हाण याने त्याच्या आईबद्दलच्या आठवणी सांगितल्या. वडील गेल्यानंतर आई पूर्णपणे खचल्याचं सूरजने सांगितलं. मी गोट्या खेळायला गेलो होतो. तेव्हा माझे वडील गेले. आमच्या अप्पांना कॅन्सर झाला होता. अचानकपणे त्यांच्या मृत्यू झाला, असं सूरज चव्हाण म्हणाला.
आमचे अप्पा गेल्यानंतर आईने त्याचं खूप टेन्शन घेतलं. त्यामुळे तिला वेड लागलं. तिला काही कळायचं नाही. हायवेला जाऊन उभी राहायची. गाड्या वगैरे आलेल्या तिला कळायच्या नाहीत. तिला भीतीच वाटायची नाही. मला लोकं येऊन म्हणायची की तुझी आई तिकडे आहे. मग मी तिला घेऊन यायचो, असं सूरज चव्हाण याने सांगितलं.
एकदा तर काय झालं ही फॉरेस्ट ( जंगलात) गेली. ती शेरडांना चारायला घेऊन गेली. शेरडा घरी आल्या पण आई आलीच नाही. ती अंधारात तिकडंच बसली. पहाटे मग घरी आली. दरवाजा वाजवला. बहिणीने दरवाजा उघडला. आईला विचारलं कुठं गेली होती म्हणून. पण तिला त्यावेळी काहीच कळत नव्हतं, असं सूरज म्हणाला.
माझ्याकडून एकदा वरूटा ( पाटा वरवंटा) आईच्या पायावर पडला. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मला वाटलं स्वत: लाच मारून घ्यावं. त्याची सल आजही माझ्या मनात आहे, असं सूरजने या मुलाखतीत सांगितलं. मी माझ्या आई- वडिलांचा लाडका होतो. मी शाळेत जायचो पण मला काही कळायचं नाही. वाचायला पण यायचं नाही. शिक्षकांनी मला शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण मला ते जमलंच नाही. आमचे अप्पा म्हणायचे की माझा पोरगा नाही शिकला तरी चालेल, असं सूरज चव्हाण म्हणाला. हे सगळं सांगताना सूरजचं मन भरून आलं होतं.