
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यातील काही स्पर्धांबाबत सोशल मीडियावर चर्चा होतेय. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण या दोघांचा एक व्हीडिओ सध्या जोरदार चर्चा होत आहे. यात धनंजय पोवार सूरज चव्हाणची मदत करताना दिसतो आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वॉशरूमच्या एरियात धनंजय पोवार, सूरज चव्हाण, घनश्याम दराडे आणि पॅडी या चौघांमध्ये संभाषण सुरु आहे. या संवादाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूरज चव्हाणला ‘नॉमिनेशन’ शब्द बोलता येत नाहीये. त्यासाठी धनंजय पोवार त्याची मदत करतो आहे. जसं टॉमी म्हणतात, तसंच नॉमी म्हण आणि मग नॉमिनेशन म्हण असं धनंजय पोवार सूरजला सांगतो. इंटरनेट म्हणतो तसं नॉमिनेट असं पॅडी त्याला सांगत असतो, याच वेळी छोटा पुढारी घनश्याम दराडे ‘नॉमिनीटेशन’ म्हण असं सांगतो. त्यावर मी पाच अक्षरं बोलायला सांगतोय अन् तू सहा अक्षरं करायला लागलाय लका…, असं धनंजय पोवार म्हणतो. या चौघांमधील संवादाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण या दोघांना सोशल मीडियावर नेटकरी सपोर्ट करताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत या व्हीडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुरा कोल्हापूरकरांचा… माणुसकी कुठे गेली तर सोडायची नाही, हे कोल्हापूरकरांकडून शिकावं… डीपी दादा एक नंबर, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. मी तर फक्त सुरज आणि डीपी दादामुळे बिग बॉस बघतोय, अशीही कमेंट या व्हीडिओवर करण्यात आलीय. इथ फक्त सूरज भाऊची हवा बाकी सगळ्यांनी घरी जावा, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय.
सूरज चव्हाण एक गावातला मुलगा आहे. त्याला एवढं काही कळत नाही. पण हळूहळू शिकेल तो… डीपीदादा जर त्याचासोबत राहिले ना… तर मग बाकीच्यांची वाट लागली म्हणून समजा… सूरज हा खूप साधा आहे त्याला काही शिकवा धनंजय दादा, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय.