बिग बॉसच्या स्पर्धकांना रितेशभाऊंचा डबल धक्का; एकाचवेळी दोनजण घराबाहेर
Bigg Boss Marathi Double Eviction : 'बिग बॉस मराठी' चा या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला. यात रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरातील सदस्यांची शाळा घेतली. तर यावेळी दोन स्पर्धक 'बिग बॉस मराठी' च्या घरातून बाहेर पडले. कोण आहेत हे दोन स्पर्धक? वाचा सविस्तर...
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये कधीही- काहीही होऊ शकतं. ‘बिग बॉस मराठी’ होस्ट रितेश भाऊची कमिटमेंट ही पैसा वसूल एन्टरटेन्मेंट आहे. घरातील सदस्य आज चांगल्या मूडमध्ये होते. पण रितेश भाऊने मात्र त्यांना मोठा धक्काच दिला आहे. या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं आहे. त्यामुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोन सदस्यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला प्रवास संपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार होती.
दोन स्पर्धक घराबाहेर
‘कलर्स मराठी’वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणारी अंतरा अर्थात योगिताने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुसाट प्रवास करायला सुरुवात केली आणि लगेचच तिच्या प्रवासाला ब्रेक लागला. ‘बिग बॉस मराठी’ चा खेळ, सदस्यांसोबत जमवून घेण्यात ती कमी पडली. तर दुसरीकडे कलर्स मराठीच्या ‘रमा राघव’ या मालिकेत राघवच्या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणारा निखिल दामले मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात कमी पडला.
योगिता काय म्हणाली?
‘बिग बॉस मराठी’च्या प्रवासाबद्दल योगिता चव्हाणने तिच्या भावना व्यक्त केल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात माझे जे मित्र-मैत्रिणी झाले होते. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून खूप त्रास झाला. माझ्या टीमसाठी मला आता टास्क खेळता येणार नाही याचं आता दु:ख आहे. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ मला कळलाच नाही. या घरात राहणं खूप कठीण आहे. इन्व्हेसमेंट बॉक्समध्ये असलेल्या 50 पॉईंटचा कॉईन आर्याला देत मी तिला नॉमिनी करतेय. माझ्यासारखे रडू नका, एकमेकांना पाठिंबा देत छान खेळा. मला ‘कलर्स मराठी’ने दिलेल्या संधीबद्दल आभार. खूप चांगला अनुभव मला मिळाला आहे, असं योगिता म्हणाली.
निखिलच्या भावना
बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर निखिल दामलेने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.घरातल्या माणसांमुळे घरावर प्रेम झालं होतं. खेळ उशिरा कळला… खेळ लवकर कळला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इन्व्हेसमेंट बॉक्समध्ये असलेला 50 पॉईंटचा कॉईन डीपी दादाला देत मी त्याला नॉमिनी करत आहे. या घरातील सगळ्यांचा आपापला एक फ्लेवर आहे. फक्त तो फ्लेवर आपण मेन्टेंन ठेवूया आणि तो अजून वाढवूया, असं तो म्हणाला.