‘बिग बॉस मराठी’ चा हा नवा सिझन चांगलाच गाजतो आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतंच कालच्या भागात एक एलिमिनेशन झालं आहे. छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर पडला आहे. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्याचा प्रोमो समोर आला आहे. रांगडा गडी ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात प्रवेश करणार आहे. हा रांगडा गडी नक्की कोण आहे? याबाबतची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या आठवड्यापासूनच या सीझनमध्ये कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं. वाईल्ड कार्ड सदस्याबद्दल अनेक नावे समोर आली. आता बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खरचं वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? घरात कोण सदस्य येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा प्रोमो सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा आहे. प्रोमोमध्ये, तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा…अस्सल फौलाद घालणार ‘बिग बॉस’च्या घरात राडा, असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणारा हा नवा सदस्य कोण? या प्रश्नाचं कोडं आज सुटणार आहे.
‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो समोर आला आहे. ‘बिग बॉसच्या घरात येणार एक गडी रांगडा, होणार लय भारी राडा’ म्हणत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. हा दुसरा तिसरा कुणी नसून कोल्हापूरचा पैलवान रांगडा गडी, बॉडीबिल्डर संग्राम चौगुले असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हा 100 % संग्राम चौगुले आहे. संग्राम चौगुलेच वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय. संग्राम भाऊ पण निक्कीच्या नादी लागू नाही म्हणजे झालं, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात बी बी करन्सीसाठी आणि बी बी फार्ममध्ये सदस्यांनी घातलेला राडा, नियमांचं उल्लंघनाबद्दल रितेश भाऊने सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. छोटा पुढारी घन:श्याम दरवडेने या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतला. आता नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉसच्या घरात काय बदल घडणार हे पाहावे लागेल.