
इंटरटेन्मेंटचा फुल धमाका असणारा बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रिमियरला केवळ काही मिनिटं राहिली आहेत. आज रात्री 9 वाजता बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमियर सुरु होणार आहे. अवघ्या काही मिनिटात नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या स्पर्धकांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. आता उत्सुकता आहे ती या पर्वाच्या ग्रँड प्रिमियरची…
‘बिग बॉस मराठी’च्या या चक्रव्यूहात विविध क्षेत्रातील कमाल अतरंगी स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता हे अतरंगी स्पर्धक कोण? यंदाच्या सिझनची थीम काय असेल? अशा अनेक रहस्यांचा उलगडा ‘बिग बॉस’प्रेमींना आता लवकरच होणार आहे .’बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रोमोमध्ये रितेश देशमुखची ‘लयभारी’ स्टाईल पाहायला मिळाली. पण आता मात्र नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही मिनिट शिल्लक आहेत. रितेशभाऊ या सगळ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करणार? याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
यंदाच्या सिझनमध्ये वेगवेगळ्या खास गोष्टी पाहायला मिळणार आहे. याआधीच्या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेते महेश मांजरेकर होते. आता मात्र यंदा अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे आता या सिझनमध्ये काय घडतं याकडे सर्वाचंच लक्ष असणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची खूप उत्सुकता आहे. अनेक वर्षांपासून मी हा शो फॉलो करतोय. आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट म्हणून ‘कलर्स मराठी’सोबत जोडला गेल्याचा आनंद आहे. ‘बिग बॉस मराठी’ला नव्या ढंगात, नव्या रुपात पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे. नव्या सीझनमध्ये राडा, धुरळा, मजा-मस्ती आणि लय भारी कल्ला होणार, असं रितेश देशमुख नव्या पर्वाबद्दल म्हणाला.