सूरज चव्हाण बारामतीत प्रचारसभेत, कुणाला पाठिंबा?; म्हणाला, दादांना झापूक झुपूक मतदान करा…
Suraj Chavan in Ajit Pawar Pracharsabha : 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाण याने निवडणुकीच्या प्रचारसभेत हजेरी लावली. बारामतीत तो प्रचारसभेत सहभागी झाला होता. त्याने बारामतीतील मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सूरज चव्हाण काय म्हणाला? वाचा सविस्तर...
राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशात काही सेलिब्रिटी देखील राजकीय मंचावर पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण हा देखील प्रचारसभेत पाहायला मिळाला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते, बारामती विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी काल (28 ऑक्टोबर) त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती तालुक्यातील कन्हेरी गावात अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. अजित पवारांनी पहिली प्रचाराची सभा घेतली. या सभेत सूरज चव्हाण सहभागी झाला होता.
सूरज चव्हाण अजित पवारांच्या प्रचारसभेत
‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण हा बारामतीतील प्रचारसभेत सहभागी झाला होता. अजित पवारांच्या प्रचाराच्या पहिल्या जाहीरसभेत सहभागी झाला होता. तोंडाला मास्क लावून सूरज चव्हाण सभेच्या ठिकाणी आला. मंचावर जात त्याने उपस्थितांना संबोधित केलं. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देत सूरज चव्हाणचं मंचावर स्वागत केलं.
नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण… असं म्हणत सूरजने भाषणाला सुरुवात केली. अजितदादांनी माझं स्वप्न पूर्ण केलंय. गरिबांना दादांनी मदत केली. मनापासून दादांचे आभार मानतो. आपल्या दादांना फुल खवून, झापूक झुपूक मतदान करा, असं आवाहन सूरज चव्हाणने उपस्थित बारामतीकरांना केलं.
अजित पवारांकडून कौतुकाची थाप
अजित पवार यांनी संबोधित केलं. तेव्हा त्यांनी सूरज चव्हाणचा उल्लेख केला. रामोशी समाजाचा सामान्या कुटुंबातला मुलगा सूरज चव्हाण… तो बिग बॉसच्या घरात गेला. त्याने बिग बॉसचं गाजवलं आणि ‘बिग बॉस’ ठरला. सूरजचा आपण टुमदार घर बांधून देणार आहोत. आपण त्याला तसा शब्द दिला आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि पुढच्या दिवाळीपर्यंत तो त्याच्या नव्या घरात प्रवेश करेन. हा माझा शब्द आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की, अजित पवार जेव्हा शब्द देतो. तेव्हा तो शब्द तो पाळतो, असं अजित पवार म्हणाले.