चॅनेलचा ‘तो’ निर्णय मला मान्यच नव्हता…; निलेश साबळेने सांगितलं ‘चला हवा येऊ द्या’ सोडण्याचं कारण
Actor Nilesh Sable on Chala Hawa Yeu Dya and Hastay na Hasayla ch pahije Show : निलेश साबळेने सांगितलं 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सोडण्याचं कारण सांगितलं आहे. तसंच नव्या कार्यक्रमावरही तो बोलता झाला. निलेश साबळे नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर...
‘चला हवा येऊ द्या’… महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला लोकप्रिय कार्यक्रम. या कार्यक्रमाने दहा वर्षे लोकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. मात्र दहा वर्षांनंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ता काही दिवसांचा ब्रेक असल्याचं चॅनेलकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होण्याआधीच अभिनेता निलेश साबळे याने या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय का घेतला असावा? याची सिनेवर्तुळात चर्चा झालीच. शिवाय प्रेक्षकाांनाही हा प्रश्न पडला होता. स्वत: निलेश साबळे याने याचं उत्तर दिलं आहे.
ते मला मान्य नव्हतं- निलेश
एका मुलाखतीत निलेशला ‘चला हवा येऊ द्या’ बंद का झालं? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा बोलताना निलेश यावर स्पष्टपणे व्यक्त झाला. तो म्हणाला की ‘चला हवा येऊ द्या’ला काही दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी चॅनेलचा होता. काही दिवस आपण थांबू… एकत्र बसून चर्चा करू की या कार्यक्रमात आणखी काय चांगलं करता येईल, असं निलेश म्हणाला.
चॅनेलने काही दिवस गॅप घेण्याचं ठरवलं. पण चॅनेल जो गॅप सांगत होतं तो गॅप खूप मोठा होता. नोव्हेंबरमध्ये आमचं या सगळ्यावर बोलणं झालं. चॅनेलचं म्हणणं होतं की ऑगस्टच्या आसपास आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु करू शकतो. पण चॅनेलचा निर्णय मला अजिबात मान्य नव्हता, असं निलेशने म्हटलं.
तेव्हा लोक तुम्हाला विसरतात- निलेश साबळे
चॅनेलचं म्हणणं होतं की, काही दिवसांसाठी या कार्यक्रमाला थोडा ब्रेक देऊयात. पण तो गॅप खूप मोठा होता. जवळपास आठ- नऊ महिने गॅप हा कलाकार म्हणून खूप मोठा वाटत होता. 15 दिवस तुम्ही दिसला नाहीत तर 16 व्या दिवशी लोक तुम्हाला विसरतात. ही फॅक्ट आहे. त्यात एकदा टीम मधले लोक बाहेर गेले. वेगवेगळ्या ठिकाणी काम करू लागले की, त्यांना पुन्हा एकत्र आणणं तसं सोपं नाही. त्यामुळे मला वाटलं की हा गॅप खूप मोठा आहे. कदाचित चॅनेल उद्या म्हणेन की तुम्ही नाही आलात तरी चालेल, असं मला वाटलं. ते कदाचित चुकीचंही असू शकतं, असं निलेश साबळे म्हणाला.