ऐ आई आपण शिवाला घरी घेऊन जाऊ…; सेटवर चिमुकली फॅन शिवाच्या भेटीला
Littel Fan on Shiva Serial Set For Meet to Actress Purva Kaushik : अभिनेत्री पूर्वा कौशिक हिला भेटण्यासाठी छोटी फॅन आली होती. ही फॅन मुव्हमेंट तिने शेअर केली आहे. या भेटी दरम्यान काय झालं? यावर पूर्वा कौशिकने प्रतिक्रिया दिली आहे. तिने काय म्हटलं? वाचा सविस्तर...

कलाकारांना त्यांचे फॅन्स भेटणं ही खूप आनंद देणारी घटना असते. मालिकेतील कलाकार तर दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे कुटुंबातील लहान थोरांना ते परिचयाचे असतात. अशीच एक मालिका सध्या प्रचंड गाजते आहे, ती म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’… ही मालिका सध्या लोकप्रिय ठरते आहे. पूर्वा कौशिक म्हणजेच आपली लाडकी ‘शिवा’. शिवाच्या लुक पासून ते तिच्या डायलॉग पर्यंत ह्या पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच शिवाचे चाहते आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘शिवा मालिकेच्या सेटवर एक चिमुकली फॅन तिला भेटायला आली होती. पूर्वा ह्या फॅन मोमेन्टबद्दल बोलताना म्हणाली, ‘खरतर ही खूप गोड गोष्ट होती, मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे ‘शिवा’ मालिका करत असताना बऱ्याच लोकांशी भेट होते आणि काही प्रेक्षक सेटवर आम्हाला भेटायला ही येतात आणि खूप कौतुक ही करतात.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेतून कळतं की लहान मुलांचा वर्ग प्रचंड ‘शिवा’ प्रेमी आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक खूप क्युट मोमेन्ट आहे. ‘एक मुलगा साधारण ३ वर्षाचा असावा त्याची आई त्याला म्हणाली काय करतोस? असं नको करुस तर तो त्याच्या आईला म्हणाला की ‘हा’ नको म्हणूस ‘ही’ म्हण इतकी त्याला ‘शिवा’ आवडते, असं पूर्वाने सांगितलं.
आणखीन एक किस्सा सांगावासा वाटतो एक मुलगा आपल्या आई- बाबानं सोबत सिनेमा पाहत होता आणि त्यात ती हेरॉईन रडत होती तर तो म्हणतो ‘ह्यां ! शिवा असं रडते का , शिवा नाही असं रडत हे कशाला रडतायत’. त्या दिवशी सेटवर एक लाहान शिवाची चाहती आली होती. ती आमच्या मालिकेत सायलेन्सर म्हणून भूमिका साकारत असलेला अर्जुनची लहान बहीण आहे. ती सकाळी लवकर सेट वर माझ्यासाठी फुलं घेऊन आली होती आणि नेमकं त्याच दिवशी माझा कॉल टाईम संध्याकाळचा होता. ती माझी आतुरतेने वाट पाहत होती, असं पूर्वा म्हणाली.
अर्जुनचा पॅक-अप झाल्यावर ही ती एक तास वाट पाहत होती. मी येईपर्यंत आणि जेव्हा तिनी मला पहिले तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता मी तो शब्दात व्यक्त नाही करू शकत. मी तो क्षण फोटो मध्ये कॅपचर करायचा प्रयत्न केला पण तो क्षण माझ्या हृदयात कोरला गेला आहे. तिचे डोळे इतके तृप्त झाले होते शिवाला भेटून, असं पूर्वाने सांगितलं.
जेव्हा असं कौतुक होतं ते ही लहान निरागस मुलांकडून ते खूप भारावून टाकणार असतं. ती तिच्या आईला सांगत होती की आपण शिवाला घेऊन घरी जाऊया किंवा आपण इथेच सेटवर थांबूया. मग तिला समजावून मी घरी पाठवले. असे क्षण कलाकारांची ऊर्जा वाढतात अजून उत्तम काम करण्यासाठी प्रेरित करतात, असं म्हणत पूर्वा कोशिकने तिच्या फॅन मोमेन्टवर भाष्य केलं.