नेटफ्लिक्सने घेतला मोठा निर्णय, आता सेवेत करणार हा बदल
कोरोनाच्या काळामुळे नेटफ्लिक्सला या ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीला प्रचंड नुकसान झाले आहे.
मुंबई | 20 जुलै 2023 : नेटफ्लिक्सने ( Netflix ) आपल्या भारतातील ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल कोट्यवधी चाहत्यांना धक्का देणारा ठरणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता आपल्याला पासवर्ड शेअरिंग करण्याच्या सुविधेवर आता मर्यादा येणार आहे. नेटफ्लिक्सचे भारतातच सर्वात जास्त ग्राहक असताना कंपनीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांचा पासवर्ड आपल्या मित्रमैत्रीणींना शेअर करता येणार नसल्याने ग्राहकांना फटका बसणार आहे.
व्हीडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स कंपनीने भारतात पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की आता नेटफ्लिक्स अकाऊंट शेअर करण्याची सुविधा केवळ एका कुटुंबापुरतीच मर्यादीत राहणार आहे. त्यामुळे आपल्या मित्र आणि मैत्रीणींना पासवर्ड शेअरींग करण्यावर निर्बंध येणार आहेत. कंपनीने पुढे म्हटले की जो कोणी युजर हा नियम तोडेल त्याला ईमेल पाठविण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळामुळे नेटफ्लिक्सला या ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीला प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जगभरात पासवर्ड शेअरिंगच्या नियमांचा आढावा घेतला जात आहे. कंपनी या निर्णयाद्वारे आपले उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.
एकाच कुटुंबात शेअरिंग
नेटफ्लिक्स कंपनी गुरुवारी एक प्रसिद्धी पत्रकात म्हटले की एक अकाऊंट आता इथून पुढे एका घरापुरतेच मर्यादीत राहील. त्या घरात राहणारी कोणीही कोणतीही व्यक्ती या पासवर्डने सुविधा घेऊ शकते. भले ती कुठेही जावो, घरी असो, प्रवासात असो की सुट्टीवर गेलेली असो, एका कुटुंबातील प्रत्येक सदस्य या पासवर्डचा वापर करु शकतील. मे महिन्यात स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या प्रमुख बाजारपेटासह अनेक देशात पासवर्ड शेअरिंग करण्यावर बंदी घातली आहे.