‘अहमदनगर महाकरंडक’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी जय्यत तयारी, 26 ते 29 एप्रिल दरम्यान होणार महास्पर्धा
नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक 2022 'उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा'ची महाअंतिम फेरी अहमदनगर इथल्या माऊली सभागृहात 26 ते 29 एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री - निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता - दिग्दर्शक अद्वैत दादरकर असणार आहेत.
मुंबई : हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक 2022 (Ahmednagar Mahakarandak) ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा’ची महाअंतिम फेरी अहमदनगर इथल्या माऊली सभागृहात 26 ते 29 एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी-मराठीच्या सहयोगाने होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रात झालेल्या प्राथमिक फेरीतून 120 एकांकिकांमधून तब्बल 33 एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, इस्लामपूर, जळगाव, धुळे, अमरावती, कोल्हापूर आणि नागपूर या केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत दाखल झालेत. 26 ते 28 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 आणि 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत अंतिम फेरीतील एकांकिकांचे प्रयोग अहमदनगर येथील माऊली सभागृहात होतील.
29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता बक्षीस समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल..अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री – निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता – दिग्दर्शक अद्वैत दादरकर असणार आहेत. यावेळी मराठी आणि हिंदीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील. त्यामुळे नाट्यप्रेमींनी कलेच्या या उत्सवात सहभागी होऊन उत्तम एकांकिकांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केलंय.
या स्पर्धेबद्दल अधिक माहिती देतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, “स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षं स्पर्धा होऊ शकली नव्हती. पण दोन वर्षांचा गॅप पडूनही यंदा स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद उल्लेखनीय आहे”
संबंधित बातम्या