Bigg Boss Marathi 3 |लोकांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी! ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी घेऊन विशाल घरी परतला
यंदाच्या बिग बॉस मराठी 3' (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा विजेता मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा असलेला विशाल निकम (Vishal nikam) ठरला आहे. त्याच्या या विजयाने गावात जल्लोष केला जात आहे.
मुंबई : यंदाच्या बिग बॉस मराठी 3′ (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा विजेता मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा असलेला विशाल निकम (Vishal nikam) ठरला आहे. त्याच्या या विजयाने गावात जल्लोष केला जात आहे. विशालला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसोबतच 20 लाख रुपयांचा धनादेशही निर्मात्यांनी दिला. या विजयाबद्दल विशालने देवाचे आभार मानले. याचबरोबर तो म्हणाला की, ‘बिग बॉस’मध्ये सामील झालेल्या सर्व स्पर्धकांचे देखील मला आभार मानायचे आहेत, कारण आज जो विशाल निकम उभा आहे तो केवळ त्यांच्यामुळेच!
स्प्लिट्सव्हिलाचा विजेता जय दुधाणे आणि विशाल यांच्यात शेवटचा सामना झाला होता. मात्र जनतेच्या अधिक मतांमुळे विशालने जयला हरवत या हंगामाचे विजेतेपद पटकावले. शोच्या पहिल्या एपिसोडपासून विशालने नेहमीच आपला खेळ सचोटीने खेळला आहे. मित्रासोबत असो की शत्रूसोबत, विशालने नेहमीच ‘न्याय्य’ पद्धतीने गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हाच प्रामाणिक प्रयत्न सर्वांनाच आवडला.
कोण आहे विशाल निकम?
विशालच्या करिअरची सुरुवात ‘मिथुन’ या चित्रपटातुन झाली. या चित्रपटात विशालने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर विशालने ‘धुमस’ या मराठी चित्रपटात काम केलं. पण चित्रपटापेक्षा मालिकाच्या माध्यमातून विशाल प्रसिद्धीच्या झोतात आला. विशालने ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले आहे. तसेच विशालने ‘दक्खनचा राजा जोतिबा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या घरासमोर रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आणि त्याला भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. विशाल याने आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वांची मन जिंकली आहेत.
माझं स्वप्न पूर्ण झालं!
या विजयाविषयी बोलताना विशाल म्हणाला की, आता खूप भारी वाटतंय. हे माझं स्वप्न होतं जे आता पूर्ण झालं आहे. ज्या दिवशी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात पाऊल टाकलं, त्याच दिवशी हे स्वप्न पाहिलं होतं. आनंद वाटतो की, उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न, डोळे बंद केल्यावर दिसणारं ध्येय आज 100व्या दिवशी पूर्ण झालं. या सगळ्या यशात माझ्या कुटुंबाचा आणि प्रेक्षक वर्गाचा वाटा आहे.’
हेही वाचा :
Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!