लॉस एंजिलिस: ’24’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये FBI एजंट रिनी वॉकरची दमदार भूमिका साकारणारी हॉलिवूड अभिनेत्री ॲनी वर्शिंगचं निधन झालं. ती 45 वर्षांची होती. ॲनीने 29 जानेवारी रोजी सकाळी लॉस एंजिलिसमध्ये अखेरचा श्वास घेतल्याची माहिती तिच्या टीमने दिली. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र ॲनीला कोणता कॅन्सर होता, हे मात्र तिच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.
ॲनी वर्शिंगला व्हिडीओ गेम ‘द लास्ट ऑफ अस’मधील टेसच्या भूमिकेला आवाज देण्यासाठीही ओळखलं जातं. व्हिडीओ गेमचे निर्माते नील ड्रकमॅन यांनी अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘आम्ही एका दमदार कलाकाराला आणि सुंदर व्यक्तीला गमावलंय’, अशा शब्दांत त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
‘टाइमलेस’ या साय-फाय सीरिजमध्ये ॲनीसोबत काम केलेली अभिनेत्री ॲबिगेल स्पेन्सरनेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो ॲनी वर्शिंग. तुझी खूप आठवण येईल’, अशी पोस्ट ॲबिगेलने लिहिली.
I miss my silly friend who helped bring Tess to life. Annie, you left us way too soon. You will forever be part of the TLoU & Naughty Dog family! ?
TLoU fans… let’s show what we’re made of. Please consider donating to her kids’ gofundme: https://t.co/3QTnZtBY4B pic.twitter.com/baNHc1wdCT
— Neil Druckmann (@Neil_Druckmann) January 29, 2023
ॲनी वर्शिंगने तिच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केलंय. यामध्ये ‘स्टार ट्रेक: इंटरप्राइज’, ’24’, ‘बॉश’, ‘द व्हॅम्पायर डायरीज’, ‘रनअवे’, ‘द रुकी’ आणि ‘स्टार ट्रेक: पिकार्ड’ यांचा समावेश आहे. 2020 मध्ये ॲनीला कॅन्सरचं निदान झालं होतं. ॲनीच्या पश्चात पती आणि तीन मुलं असा परिवार आहे.