मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवीन अपडेट समोर येत आहे. आरोपी शिझान खानच्या जामिनावर नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिझानच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला. तुनिशा ही एका डेटिंग ॲपवरील अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती, असं त्यांनी न्यायालयात म्हटलंय. आत्महत्येच्या काही दिवस आधी तुनिशा अलीच्या कंपनीत होती, असंही म्हटलं गेलंय. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी 11 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. तुनिशाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
24 डिसेंबर रोजी तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याच मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी शिझानला अटक झाली. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी 21 ते 23 डिसेंबरदरम्यान तुनिशा ही अलीसोबत होती, असं शिझानच्या वकिलांनी कोर्टात म्हटलंय. सोमवारी वसई इथल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तुनिशाच्या वकिलाने मागितलेली मुदतीची विनंती मान्य केली. या जामिन याचिकेवरील पुढील सुनावणी आता 11 जानेवारी रोजी होणार आहे.
तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानचा काहीच दोष नाही असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय कोर्टात म्हणाले. इतकंच नव्हे तर आत्महत्येच्या 15 मिनिटं आधी तुनिशा ही अलीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, असाही दावा त्यांनी केला. या अँगलने तपास करण्याची मागणी त्यांनी न्यायाधीशांसमोर केली. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणतीच सुसाईड नोट सापडलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
रविवारी तुनिशाच्या आईने पुन्हा एकदा शिझानवर गंभीर आरोप केले. ड्रग्ज विकत घेण्यासाठी त्याने माझ्या मुलीचा आणि तिच्या पैशांचा वापर केला, असं त्या म्हणाल्या. याआधी शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिशाची आई वनिता शर्मा यांच्यावर मुलीकडे दुर्लक्ष केल्याच आरोप केला होता. मात्र या आरोपांनाही त्यांनी फेटाळलं.
“तुनिशासोबत माझं नातं कसं होतं, याचं स्पष्टीकरण मला कोणालाच द्यायची गरज नाही. तुनिशा माझी मुलगी होती, तिच्या सर्वांत जवळची व्यक्ती मीच होती. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ती मला प्रत्येक गोष्ट सांगायची”, असं वनिता म्हणाल्या होत्या.