उत्तरप्रदेशमधील ललितपूर (Lalitpur Rape Case) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकार गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यानेच (UP Cop) तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त होत आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही (Riteish Deshmukh) आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. रितेशने याप्रकरणी ट्विट केलं असून घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. ‘रक्षकच भक्षक बनल्यास सामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जावं’, असा सवाल त्याने केला.
‘जर हे खरं असेल तर याहून घृणास्पद काहीच असू शकत नाही. रक्षकच भक्षक बनल्यास सामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जावं? अशा लोकांना भरचौकात मारलं पाहिजे. सरकारने याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी’, अशी मागणी रितेशने या ट्विटद्वारे केली.
अगर यह सच है तो इससे बदतर कुछ नहीं हो सकता। रक्षक ही भक्षक बन जाए तो आम इंसान न्याय माँगने कहाँ जाए। ऐसे लोगों को सरे आम, चौराहे पर मारना चाहिए। साकार जल्द कार्यवाही करे और सख़्त से सख़्त सजा दे। https://t.co/lYuNBZB3cK
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 4, 2022
22 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र न्याय मिळण्याऐवजी तिला छळालाच बळी पडावं लागलं. तिथे उपस्थित स्टेशन प्रमुख टिळकधारी सरोजनेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने आपली कहानी एसपींना सांगितली आणि त्यानंतर ही कारवाई केली जात आहे. यानंतर ललितपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पाठक यांनी सांगितले की, पाली इथले रहिवासी असलेल्या चार मुलांनी त्या 13 वर्षीय मुलीला कथितपणे आमिष दाखवलं होतं. तर 22 एप्रिल रोजी तिला भोपाळला नेलं आणि तीन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.