मुंबई : अभिनेते सतीश कौशिक हे गुरुग्रामला त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. मात्र वाटेत त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे प्राण वाचवता आले नाही. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वीच ते जुहूमधील एका होळीच्या पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जावेद अख्तर, अली फजल, रिचा चड्ढा, महिमा चौधरी यांसारख्या कलाकारांसोबत होळी साजरी केली. या सेलिब्रेशनचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. होळीच्या दिवशी सर्वांसोबत हसळ-खेळत राहणारी व्यक्ती अचानक या जगाचा निरोप घेईल, याची कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र आता सोशल मीडियावर त्यांच्या शेवटच्या पोस्टवरील एका युजरची कमेंट खूप व्हायरल होत आहे.
सतीश कौशिक यांनी दोन दिवसांपूर्वी होळीच्या पार्टीतील काही फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले होते. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. त्यापैकीच एका युजरने अशी कमेंट केली, त्याची आता जोरदार चर्चा होतेय.
सतीश कौशिक यांनी होळीचे चार फोटो पोस्ट केले होते. त्यापैकी पहिल्या फोटोमध्ये ते अली फजल आणि रिचा चड्ढासोबत दिसत आहेत. या तिघांच्या मागे एक पांढरा कुर्ता घातलेली एक मुलगी पहायला मिळतेय. तिचे हावभाव पाहून एका युजरने कमेंट लिहिली, ‘सर, मागे पांढऱ्या कुर्त्यामध्ये असलेल्या मुलीला सांभाळा.. कदाचित तिला हार्ट अटॅक आला आहे.’ त्या युजरने ही कमेंट सहजच लिहिली, मात्र त्यावर आता नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तुम्ही जे लिहिलात, ते खरं ठरलं, फक्त व्यक्ती बदलली’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे कसं शक्य आहे, सरांना खरंच हार्ट अटॅक आला’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
दिल्लीत शवविच्छेदन पार पडल्यानंतर सतीश कौशिक यांचं पार्थिव एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील. सतीश कौशिक यांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं आहे. डॉक्टरांना त्यांच्या शरीरावर कोणतेच निशाण दिसले नाहीत. सतीश कौशिक यांच्या निधनप्रकरणी नेहमीप्रमाणे सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत तपास सुरू केला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दिल्लीच्या दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं.