Sulochana Latkar : 300 हून अधिक चित्रपटात अभिनय करणाऱ्या सुलोचना लाटकर यांचे निधन, उद्या होणार अंत्यसंस्कार
Sulochana Latkar Passed Away : सुलोचना लाटकर यांच्या निधनाने दिग्गज कलाकारांसोबत काम करणारी ऑन स्क्रीन आई गेली. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई : अभिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि दिलीप कुमार अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करणाऱ्या वरिष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन झाले. ही सीनेमा जगतातील सर्वात मोठी दुःखद बातमी आहे. सुलोचना लाटकर यांची प्रकृती बरी नव्हती. ९४ वर्षीय वरिष्ठ अभिनेत्रीला दादर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. सुलोचना लाटकर यांच्या निधनाने दिग्गज कलाकारांसोबत काम करणारी ऑन स्क्रीन आई गेली. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सुलोचना लाटकर यांचा अल्पपरिचय
सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1929 साली झाला. चिमुकला संसार सिनेमातून पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आल्या. ‘वहिनीच्या बांगड्या’ सिनेमामुळे खरी ओळख मिळाली. प्रपंच, मराठा तितुका मेळवावा, एकटी, मोलकरीण, सासुरवास हे सुलोचना दीदी यांचे गाजलेले चित्रपट आहेत. सुजाता, जॉनी मेरा नाम, कोरा कागज, कटी पतंग, बहारो के सपने, रेश्मा और शेरा हिंदीतील गाजलेले सिनेमे आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मजबूर’ सिनेमात भूमिका केली.
त्यांच्या अनेक भूमिका रसिकांच्या लक्षात
गेली काही दशके त्यांनी हिंदी, मराठी भाषेत रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या या अनेक भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना एका चाहत्याने व्यक्त केली. सुलोचना दीदी यांनी सुमारे २५० हिंदी आणि ५० मराठी चित्रपटात अभिनय केले आहे.
उद्या होणार अंत्यसंस्कार
श्वसनाच्या आजाराने सुलोचना लाटकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. सुलोचना दीदी यांचे पार्थिव शरीर उद्या सकाळी ११ वाजतापासून संध्याकाळी पाच वाजतापर्यंत प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतीम दर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होतील.