‘मेरा रंग दे बसंती…’चे गायक भूपिंदर सिंग यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; बॉलिवूडवर शोककळा
भूपिंदर सिंग यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत होता. लघवीचा त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून त्रास सुरू झाला होता. त्या आजारपणातच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांची पत्नी मितालीने सांगितले.
मुंबईः भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंग (Famous Singer Bhupinder Singh) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन (passes away) झाले. त्यांच्या या निधनाची बातमी त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंग यांनी दिली. त्यांच्या निधनाची बातमी देताना मिताली सिंगने सांगितले की, भूपिंदर सिंग यांनी सोमवारी संध्याकाळी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भूपिंदर सिंग यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रावर (music) शोककळा पसरली आहे.
मिताली सिंग यांनी त्यांच्या निधनाची बातमी देताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून भूपिंदर सिंग आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्याना अनेक आजाराचा त्रास होत होता. त्यातच त्यांना लघवीचा अधिक त्रास होत असल्याने त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
मुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली
भूपिंदर सिंग यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या आपल्या आवाजाने भूपिंदर सिंह यांनी अनेक गझल अजरामर केल्या. त्यांचा धीरगंभीर आणि भावस्पर्शी आवाज रसिकांच्या मनात कायमस्वरुपी रुंजी घालत राहील असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
गाजलेली गाणी
भूपिंदर सिंग यांनी मौसम, सत्ता पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दूरियां आणि हकीकत या अनेक चित्रपटातीली गाणी गायिली आहेत.’मेरा रंग दे बसंती चोला’, ‘प्यार हमें मोड़ पर ले गया’, ‘हुजूर इस कादर’, ‘एक अकेला इस शहर में’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बीटी ना बिताये रैना’ ही गाजलेली गाणीही त्यांनीच गायिली होती.
वडिलांकडूनच गाण्याचा वारसा
भूपिंदर सिंग हे बॉलीवूडचे पार्श्वगायक तसेच गझल गायक होते. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्यांचे वडील प्राध्यापक नाथसिंहजी हे प्रशिक्षित गायक होते. वडिलांनीच भूपिंदरला गाण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांचे वडील खूप कडक शिक्षक होते. अशा परिस्थितीत भूपिंदर सिंग यांना एकेकाळी संगीत आणि त्यातील वाद्यांचा तिटकारा असायचा.
बॉलीवूडमध्ये पहिला ब्रेक
भूपिंदर सिंग आपल्या गायिकेच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम सादर करत होते. ते ज्याप्रमाणे गाजलेले गायक होते त्याच प्रमाणे ते उत्तम गिटार आणि व्हायोलिन वादकही होते. 1962 मध्ये, संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी भूपिंदर यांना आकाशवाणीचे निर्माते सतीश भाटिया यांच्या एका पार्टीत गाताना ऐकले होते. त्यानंतर त्यांनी भूपिंदर यांना मुंबईत बोलावून घेऊन मोहम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत ‘होके मजबूर उने मुझे बुले होगा’ या गाण्याची त्यांना संधी दिली. हकीकत चित्रपटातील या गाणे प्रचंड गाजले होते.
मिताली बांगलादेशची प्रसिद्ध गायिका
1980 मध्ये भूपिंदर सिंग यांनी मिताली मुखर्जी यांच्याशी लग्न केले. मिताली ही बांगलादेशची प्रसिद्ध गायिका आहे. नंतर या जोडप्याने अनेक गझल एकत्र गायिल्या आणि अनेक कार्यक्रमही त्यांनी एकत्र केले होते. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव निहाल सिंग असून निहालही संगीतक्षेत्रातच काम करत आहे.