मुंबई : 17 जानेवारी 2024 | सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ हा शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हा शो संपण्यासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. येत्या 28 जानेवारी रोजी या सिझनचा विजेता घोषित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन या दोघांमधील भांडणं हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये भांडण होताना दिसत आहे. या भांडणादरम्यान दोघं एकमेकांना बरंवाईट बोलून जातात. अंकिताने तर थेट घटस्फोटाचाही उल्लेख केला होता. अशातच एका भांडणादरम्यान आता विकीने अंकिताची पोलखोल करण्याची धमकी दिली आहे. त्याचसोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं नाव घेत त्याने अंकिताला सुनावलं आहे.
अंकिता गार्डन एरियामध्ये झोपलेली असते आणि विकी मन्नारासोबत गप्पा मारत असतो. त्यानंतर विकी अंकिताला कॉफी घेणार का विचारतो आणि किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी जातो. थोड्या वेळानंतर अंकिता जेव्हा आत जाते, तेव्हा तिला मन्नाराच्या हातात कॉफीचा कप पहायला मिळतो. हे पाहून ती विकीला प्रश्न विचारते की, तू माझ्यासाठी कॉफी आणायला गेला होतास ना? त्यावर विकी म्हणतो, “तू झोपली होतीस. म्हणून मी कॉफी आणली नाही. थांब मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो.” हे ऐकून अंकिता चिडते आणि तिथून निघून जाते. अंकिताचं हे वागणं विकीला अजिबात आवडत नाही.
विकी अंकिताला तिच्या वागणुकीवरून सुनावतो. “मी आता सर्वकाही करून थकलोय”, असं तो म्हणतो. हे ऐकून अंकिता म्हणते, “मीसुद्धा थकली आहे.” त्यावर विकी ओरडून म्हणतो, “तू काहीच केलं नाहीस. जर मी आता खरं बोलायला लागलो तर तू ऐकू शकणार नाही. तू हे सर्व फालतू नाटक करू नकोस. इथेच आता सर्व खरं बोलून टाकावं अशी माझी इच्छा आहे. मी खरं बोललो तर तू ऐकू शकशील का? कृपया माझ्याबद्दल हे नरेटिव्ह बनवणं बंद कर. मी तुझ्यासाठी जे काही केलं, तुझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिलो. ते सर्व मला स्पष्ट आठवतंय. जेव्हा तू अशी वागतेस, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.”
यापुढे बोलताना विकी सुशांतचा उल्लेख करतो. “सुशांतचं प्रकरण इतकं मोठं होतं. इतक्या सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हा मी तुझ्यासोबत उभा होतो. तुला जितक्या मुलाखती द्यायच्या होत्या, जे तुला बोलायचं होतं ते मी तुला बोलू दिलं. मी कधीच त्यामध्ये आलो नाही. तुझ्यासोबत बसून मी स्वत: सर्व गोष्टी लिहून काढायचो की तुला काय करावं लागेल आणि काय नाही. तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्यासोबत होतो. कधीच कोणते प्रश्न उपस्थित केले नाहीत. आज मी काहीही केलं तरी तुझं तोंड वाकडं होतं. तू मला प्रश्न विचारतेस. हे सर्व काय आहे”, असा सवाल तो अंकिताला करतो.