नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर इथं सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं. महिला महापंचायत भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर जंतर-मंतर इथलं सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलं. ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट तसंच विनेश फोगट यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी नव्या संसद भवनाबाहेर महापंचायत भरविण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला होता. आता या सर्व प्रकरणावर बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने प्रतिक्रिया दिली आहे.
विशालने याप्रकरणी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या संसद भवनावर निशाणा साधला. साक्षी मलिकने पोस्ट केलेला व्हिडीओ शेअर करत विशालने लिहिलं, ‘नव्या महालाच्या भिंती आणखी मोठ्या असतील, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या जनतेचा आवाज आणखी दाबला जाईल.’ विशालच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या ट्विटवरून विशाललाच ट्रोल केलं आहे.
Naye mahal ki deewaarein aur bhi moti hongi, taaki baahar se aa rahi janata ki awaazein aur bhi dab jaayein. https://t.co/rj5YclQXEe
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) May 28, 2023
आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतरवरील तंबू उखडून टाकले. आंदोलकांनी आणलेल्या गाद्या, चटया, कुलर, पंखे, ताडपत्री आणि इतर साहित्यही बाजूला केले आणि संध्याकाळपर्यंत आंदोलन पूर्णपणे मोडून काढलं. मोर्चाला परवानगी दिली नव्हती, तरीही आंदोलकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. कुस्तीपटूंना धक्काबुक्की करून फरपटत बसगाड्यांमध्ये कोंबण्यात आलं असा आरोप आंदोलकांनी केला.
ब्रिजभूषण यांच्याविरोधातील तक्रारीची केंद्र सरकारने गंभीर दखल न घेतल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर ठिय्या आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे अखेर दिल्ली पोलिसांना ब्रिजभूषणविरोधात गुन्हा दाखल करावा लागला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. या आंदोलनाला विविध खाप पंचायची, हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे.