हॅप्पी बर्थ डे जेनेलिया… रितेश दादा वहिनीला काय सरप्राईज देणार?
जेनेलियाच्या वाढदिवासानिमित्ताने नेहमीच रितेशचे हटके प्लान असतात. यंदा रितेश जेनेलियाला काय सरप्राईज देतो याकडे देखील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
बॉलीवूडमधील सर्वात गोंडस आणि बबली अभिनेत्रींपैकी एक, जेनेलिया डिसूझाचा(Genelia D’Souza ) आज वाढदिवस आहे. जेनेलिया डिसूझाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून पदार्पण केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखसोबत(Riteish Deshmukh) जेनेलिया डिसूझाचे विवाह झाला आहे. दोघे बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखले जातात. जेनेलियाच्या वाढदिवासानिमित्ताने नेहमीच रितेशचे हटके प्लान असतात. यंदा रितेश जेनेलियाला काय सरप्राईज देतो याकडे देखील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
जेनेलिया आहे राज्यस्तरीय क्रीडापटू आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू
5 ऑगस्ट 1987 रोजी जेनेलियाचा जन्म झाला. जेनेलियाने कधीही विचार केला नव्हता की ती चित्रपटांमध्ये करिअर करेल. जेनेलिया राज्यस्तरीय क्रीडापटू आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आहे. शालेय शिक्षण घेत असताना, जेनेलियाला बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत पार्कर पेनच्या जाहिरातीत काम करण्याची ऑफर मिळाली, जी ती नाकारू शकली नाही. त्यावेळी जेनेलिया केवळ 15 वर्षांची होती आणि तिला या जाहिरातीतून खूप प्रसिद्धी मिळाली.
तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
जेनेलियाने 2003 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. के विजय भास्कर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख जेनेलियाच्या विरुद्ध भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या सेटवर जेनेलिया आणि रितेश यांची मैत्री झाली आणि त्यांची ऑनस्क्रीन जोडी आणि यांचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि दोघांचा चित्रपट प्रवास पुढे सरकू लागला. या चित्रपटानंतर जेनेलियाला एकामागून एक अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आणि हिंदी सोबतच तमिळ, तेलुगु, कन्नड, मराठी इत्यादी चित्रपट तिच्या उत्कृष्ट अभिनयाने चर्चेत येऊ लागले.
10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश-जेनेलिया अडकले लग्नाच्या बेडीत
जेनेलिया आणि रितेशच्या मैत्रीचे रुपांतर वैयक्तिक आयुष्यातही प्रेमात झाले होते. 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर जेनेलिया फारच कमी चित्रपटांमध्ये दिसली आणि तिच्या कौटुंबिक जीवनात पूर्णपणे मग्न झाली. जेनेलिया आणि रितेश यांना राहिल आणि रियान ही दोन मुले आहेत. जेनेलिया सध्या चित्रपटांपासून दूर आहे.
रितेश-जेनेलियाची जोडी पुन्हा एकदा ऑनक्रीन दिसणार
जेनेलियाच्या प्रमुख चित्रपटांमध्ये सत्यम, मस्ती, सुभाष चंद्र बोस, हॅपी, राम, लाइफ पार्टनर, मेरे बाप पहले आप, जाने तू या जाने ना, डान्स पे चान्स, फोर्स, तेरे नाल लव हो गया, फोर्स 2, मॉली इत्यादींचा समावेश आहे. जेनेलिया लवकरच तिचा अभिनेता पती रितेश देशमुखसोबत मिस्टर ममी या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.