मुंबई : 16 डिसेंबर 2023 | मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर घरी परतल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याला उपचारासाठी तातडीने अंधेरी इथल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल केलं असता रात्री 10 च्या सुमारास श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असून काही दिवसांत डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती पत्नी दिप्ती तळपदेनं सोशल मीडियाद्वारे दिली. आता हार्ट अटॅक येण्यापूर्वीचा श्रेयसचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये श्रेयस त्याच्या आणि इतर कलाकारांसोबत मिळून चित्रपटाची शूटिंग करताना दिसतोय.
अक्षय कुमारसोबत इतरही कलाकार ‘वेलकम 3’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार, अर्षद वारसी, कृष्णा अभिषेक, श्रेयस तळपदे हे एक कॉमेडी सीन शूट करताना दिसत आहेत. एकीकडे अक्षय, अर्षद आणि कृष्णासोबत इतर कलाकार एका उंचावर सीन शूट करत आहेत, तर दुसरीकडे काही कलाकारांसोबत श्रेयस शिडीने वर चढताना दिसतोय.
शुक्रवारी अक्षय कुमारने रुग्णालयात जाऊन श्रेयसची भेट घेतली. त्यानंतर श्रेयसची पत्नी दिप्तीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. ‘माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता त्याची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करते. तुमचा भक्कम पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे,’ अशा शब्दांत दिप्तीने भावना व्यक्त केल्या होत्या.
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग संपवून घरी परतलेल्या श्रेयसला श्वास घेण्यास त्राण जाणवू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ या फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शक अहमद खान करतोय. या चित्रपटात श्रेयससोबतच अक्षय कुमार, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, झाकीर हुसैन आणि यशपाल शर्मा यांच्या भूमिका आहेत.