मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे आज (बुधवार) पहाटे कर्जतमधल्या एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांच्यावर 252 कोटी रुपयांचं कर्ज होतं. गेल्याच आठवड्यात त्यांच्या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची याचिका न्यायालयाने मान्य केली होती. ND’s Art World Pvt Ltd या नितीन देसाईंच्या कंपनीने 2018 मध्ये ECL फायनान्सकडून दोन कर्जांद्वारे 185 कोटी रुपये घेतले होते. जानेवारी 2020 पासून या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) बी. एन. तिवारी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “नितीन देसाई हे आर्थिक समस्यांचा सामना करत होते आणि त्यांनी माझ्याकडे मदत मागितली होती. बँक लोनच्या माध्यमातून इतर कर्ज फेडलं जावं अशी त्यांची इच्छा होती. कोविडनंतर त्यांचा स्टुडिओ बिझनेस बराच मंदावला होता. कारण मोठमोठे शूटिंग्स नंतर मुंबईत केले जाऊ लागले.”
नितीन देसाई यांच्या स्टुडिओ बिझनेसला कोविडमुळे खूप मोठा फटका बसला होता. ND’s Art World ही त्यांची कंपनी ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतींचं आयोजन, देखभाल आणि हॉटेल्स, थीम रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, मनोरंजन केंद्राशी संबंधित सुविधा आणि सेवा प्रदान करत होती.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर आमदार महेश बालदी यांनीही शोक व्यक्त केला. “आम्ही महिन्याभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. नवीन चित्रपट शूटसाठी येणार आहे. पण एनडी स्टुडिओत टीव्ही शोचंच शूटिंग होत होतं. त्याने आर्थिक अडचण काही दूर झाली नाही.”, असं आमदार महेश बालदी यांनी सांगितलं.
नितीन देसाई यांचा मोबाईल पोलिसांना ताब्यात घेतला आहे. ज्या ऑडिओ क्लिपची आता चर्चा रंगत आहे, त्या ऑडीओ क्लिपची पडताळणी फॉरेन्सिक टीम करत आहे. नितीन देसाई यांनी काही लोकांची नावे या ऑडीओ क्लिपमध्ये रेकॉर्ड केल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण ती नावं कोणची आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. ऑडीओ क्लिपची पडताळणी सर्वप्रथम पोलिसांकडून केली जाईल. शिवाय नितीन देसाई यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या ऑडिओ क्लिप त्यांच्याच आवाजातील आहेत का? याची खात्री रायगड पोलिसांकडून करण्यात येणार आहे.