मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीदेखील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना दुखापत झाली. हैदराबादमधील रुग्णालयात उपचारानंतर ते मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी काही काळ लागणार आहे. बिग बींच्या बरगड्यांना मार लागला आहे. आपल्या ब्लॉगद्वारे त्यांनी या दुखापतीची माहिती दिली. या घटनेनंतर जवळपास 41 वर्षांपूर्वी ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या या भयंकर अपघाताची आठवण चाहत्यांना होतेय. बिग बींना याआधीसुद्धा सेटवर शूटिंगदरम्यान दुखापत झाली होती. मात्र ‘कुली’च्या सेटवर जी घटना घडली होती, ती कधीच कोणी विसरू शकणार नाही. त्या घटनेनं बिग बींच्या कुटुंबीयांसह संपूर्ण देश हादरला होता.
26 जुलै 1982 रोजी ही घटना घडली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन हे कुली या चित्रपटाची शूटिंग करत होते. बेंगळुरूमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. बिग बींना त्यादिवशी एका ॲक्शन सीनचं शूटिंग करायचं होतं. या सीनमध्ये त्यांना अभिनेते पुनीत इस्सार यांच्याशी हाणामारी करायची होती. पुनीत यांना अमिताभ बच्चन यांच्या तोंडावर मुक्का मारायचा होता आणि त्यांना मागे टेबलवर पाडायचं होतं. निर्मात्यांनी बिग बींना सांगितलं होतं की हा सीन ते बॉडी डबलसोबत शूट करतील. मात्र त्यांनी स्वत: तो सीन शूट करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्या सीनचं शूटिंग पूर्ण झालं, सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र थोड्या वेळानंतर बिग बींच्या पोटात दुखू लागलं. त्यांच्या शरीरातून कुठूनही रक्तस्राव होत नव्हता. त्यामुळे या गोष्टीकडे तितक्या गंभीरतेने पाहिलं गेलं नव्हतं. काहींनी त्यांच्या पोटावर मलम लावला. मात्र वेदना होत असल्याने बिग बी हॉटेलच्या रुमवर निघून गेले. पेन किलरची गोळी त्यांनी खाल्ली आणि ते झोपून गेले. दुसऱ्या दिवशीही वेदना कमी होत नसल्याने बिग बींनी फिजिशियनला बोलावलं. त्यावेळीसुद्धा सर्व टेस्ट करण्यात आल्या होता.
डॉक्टरांनी जेव्हा एक्स-रे पाहिला तेव्हा त्यांना डायफ्रामच्या खाली गॅस पहायला मिळाली, जो फक्त दुखापतग्रस्त आतड्यातूनच येऊ शकतो. नेमकी समस्या समजली होती, मात्र तोपर्यंत अमिताभ यांची तब्येत आणखी बिघडली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र इन्फेक्शन संपूर्ण शरीरात पसरला होता. ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना न्युमोनिया झाला होता. अखेर त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर जवळपास आठ तासांची शस्त्रक्रिया झाली.
बिग बींच्या पोटाच्या खालच्या भागात रक्तस्राव होत असल्याने त्यांना डॉक्टरांनी ‘क्लिनिकली डेड’ (clinically dead) घोषित केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना ॲड्रेनालाईनचे इंजेक्शन देऊन वाचवलं. त्यावेळी बिग बी रुग्णालयात असताना चाहत्यांनी रक्ताने त्यांनी पत्रं लिहिली होती. आघाडीच्या राजकारण्यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती. अखेर ते बरे झाले आणि त्यांनी कुलीचं शूटिंग पूर्ण केलं.
अपघातानंतर कुली या चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला होता. मूळ कथेत बिग बींच्या पात्राचा शेवटी मृत्यू होणार होता. परंतु निर्मात्यांनी तसं न करण्याचा निर्णय घेतला.
बऱ्याच वर्षानंतर बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या घटनेविषयी सविस्तर लिहिलं होतं. ‘मी जणू कोमातच होतो. ब्रीच कँडीमध्ये आल्यानंतर पाच दिवसांत माझ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया झाली होती. त्या शस्त्रक्रियेनंतर मी बराच वेळ शुद्धीवर आलो नव्हतो. काही मिनिटांसाठी डॉक्टांनी मला क्लिनिकली डेड घोषित केलं होतं. पण डॉ. वाडिया यांनी माझे प्राण वाचवले. मी शेवटची एक संधी घेऊन पाहतो असं म्हणत त्यांनी माझ्या ॲड्रेनालाइनमध्ये इंजेक्शन्स पंप करण्यास सुरुवात केली. जवळपास 40 ॲम्प्युल्सनंतर मी शुद्धीवर आलो होतो’, असं त्यांनी लिहिलं होतं.