मुंबई- बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींमधील अफेअरच्या चर्चा काही नव्या नाहीत. सेटवर काम करताना अनेक कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यापैकी काही जणांनी लग्नगाठ बांधत आपल्या नात्याला नवीन नाव दिलं. तर काहींचं नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअप झालं तरी त्यांच्या अफेअरच्या चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच होत असतात. 2000 च्या दशकात अशा बऱ्यात हिरो-हिरोइन्सचे अफेअर चर्चेत होते. त्यापैकीच चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji).
अभिषेक आणि राणी मुखर्जीच्या रिलेशिनशिपच्या चर्चांना तेव्हा ब्रेक लागला जेव्हा अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न केलं. अभिषेक-राणीच्या रिलेशनशिपवरून एकदा अभिनेत्री प्रियांका चोप्राने चांगलाच प्रँक केला होता. प्रियांकाने अभिषेकच्या मोबाइलवरून राणी मुखर्जीला मेसेज केला होता. हा मेसेज वाचून राणीलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र तिनेसुद्धा अभिषेकच्या मेसेजचं उत्तर मजेशीर पद्धतीने दिलं होतं.
प्रियांका चोप्राने 2006 मध्ये सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. प्रियांकाला जेव्हा याविषयी विचारण्यात आलं होतं तेव्हा तिने अभिषेकसोबत प्रँक केल्याचं सांगितलं होतं.
“अभिषेकने स्वत: या प्रँकची सुरुवात केली होती. मी, अभिषेक आणि रितेश एकत्र चित्रपटाची शूटिंग करत होतो. त्यावेळी अभिषेक माझ्याजवळ येऊन बसला. तिथेच माझा मोबाइल ठेवलेला होता. अभिषेकने बराच वेळ माझा मोबाइल लपवला होता. थोड्या वेळानंतर मला माझा मोबाइल मिळाला. मात्र या प्रँकचा बदला घेण्याचा निर्णय मी घेतला. त्यामुळे मलासुद्धा अभिषेकसोबत प्रँक करण्याची संधी मिळाली”, असं ‘देसी गर्ल’ने सांगितलं.
अभिषेक सेटवर त्याचा मोबाइल ठेवून दुसरीकडे गेला होता. त्याच संधीचा फायदा घेत प्रियांकाने त्याच्या मोबाइलमधून राणी मुखर्जीला मेसेज केला. “तू कुठे आहेस? मला तुझी खूप आठवण येतेय. तू मला भेटू शकतेस का”, असा मेसेज प्रियांकाने राणीला केला. त्यावर राणीने उत्तर देताना विचारलं की ‘नेमकं काय झालंय?’
अभिषेक आणि राणी मुखर्जीची लव्ह-स्टोरी ही बंटी बबली आणि युवा या चित्रपटांच्या सेटवरून सुरू झाली. या चित्रपटांमध्ये काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली. या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत होती.