अभिनेत्री रवीना टंडनने नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवलं. त्यानंतर 2022 मध्ये जेव्हा तिने ‘केजीएफ: चाप्टर 2’ या दाक्षिणात्य चित्रपटातून कमबॅक केलं, तेव्हा तिची जोरदार चर्चा झाली. यानंतर तिने नेटफ्लिक्सच्या ‘अरण्यक’ या क्राइम थ्रिलर वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली. पण तुम्हाला माहितीये का, रवीनाचा पती अनिल थडानी याचंही फिल्म इंडस्ट्रीत मोठं नाव आहे. अनिल हा एक नॉन स्टुडिओ डिस्ट्रीब्युशन कंपनी ‘AA Films’चा संस्थापक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल थडानीच्या डिस्ट्रीब्युशन कंपनीने साऊथच्या चार मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनचे राइट्स विकत घेतले आहेत.
या चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2: द रूल’, रामचरणचा ‘गेम चेंजर’, प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा ‘कल्की 2898 AD’ आणि ज्युनिअर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान यांच्या ‘देवारा: पार्ट 1’चा समावेश आहे. थडानीच्या डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरसुद्धा या चित्रपटांचे राइट्स विकत घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘मनी कंट्रोल’च्या एका रिपोर्टनुसार, एए फिल्म्सने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट उत्तर भारतात दाखवण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपयांना त्याचे हक्क विकत घेतले आहेत. याच रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की नेटफ्लिक्सला या चित्रपटाचे डिजिटल राइट्स 100 कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत.
अनिल थडानीच्या एए फिल्म्सने रामचरण आणि कियारा अडवाणी यांच्या ‘गेम चेंजर’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे राइट्स 75 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. तर ‘देवारा: पार्ट 1’चे राइट्स 50 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित पॅन इंडिया प्रोजेक्ट ‘कल्की 2898 AD’चे राइट्स 100 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत.
अनिल थडानी हा निर्माते आणि दिग्दर्शक कुंदन थडानी यांचा मुलगा आहे. थडानी कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून डिस्ट्रीब्युशनच्या व्यवसायात आहेत. ‘स्टंप्ड’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची रवीना टंडनशी ओळख झाली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने रवीनाने 2003 मध्ये निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीना आणि अनिल यांनी उदयपूरमध्ये शिव निवास पॅलेसमध्ये लग्न केलं. या दोघांना राशा आणि रणबीर ही दोन मुलं आहेत.