Nitin Desai : नितीन देसाई यांचं 250 कोटी रुपयांचं कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या बँकेचा नियम
कर्जाचा डोंगर डोक्यावर उभ्या राहिल्याने नितीन देसाई यांनी आपलं जीवन संपवलं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या कर्जाची रक्कम कोण फेडणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई : सिनेसृष्टीत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा नावलौकिक होता. मोठे सेट म्हंटलं की त्यांचंच नाव पुढे असायचं. पण असं सर्व असताना त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. कर्जाची रक्कम फेडणं अशक्य असल्याचं पाहून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या डोक्यावर 250 कोटी रुपयांचं कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम आणि व्याज धरून एकूण रक्कम 250 कोटी रुपयांच्या घरात गेली होती. त्यामुळे ते चिंतेत होते, असं प्राथमिक तपासात पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यांच्या पश्चात आता 250 कोटी रुपयांची कर्जाची रक्कम कोण फेडणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जाची रक्कम कोणाकडून वसूल केली जाणार?
नितीन देसाई यांच्यावर 250 कोटी रुपयांचं कर्ज होतं. जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर फायनान्स कंपन्या कर्जाची रक्कम कोणाकडून वसूल करतात? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी वेगवेगळे नियम केले आहेत. कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर होम लोन, वाहन लोन आणि पर्सनल लोनची रिकव्हरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
होम लोनसाठी काय आहे नियम?
होम लोन घेताना घराचे कागदपत्रं तारण म्हणून ठेवले जातात. कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जबाबदारी सह कर्जदारावर असते. या व्यतिरिक्त मृत व्यक्तीचे वारस जसं की मुलं आणि संबंधित व्यक्तीला कर्ज फेटावं लागतं. जर कर्जाची रक्कम फेडण्यास सक्षम असतील तर त्यांना जबाबदारी दिली जाते.
बँक किंवा फायनान्स कंपन्या वारसदारांना मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा पर्याय देतात. जर त्यांनी असमर्थता दाखवली तर बँक सदर मालमत्तेचा लिलाव करते. या रक्कमेतून कर्जाची रक्कम वसूल केली जाते. आता तर बँक कर्ज देतानाच सदर व्यक्तीचा विमा काढते. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर बँक विम्याच्या माध्यमातून पैसे वसूल करते.
पर्सनल लोनसाठी काय आहे नियम?
पर्सनल लोन सुरक्षित लोनच्या यादीत बसत नाही. जर लोन फेडण्यापूर्वी सदर व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक दुसऱ्या व्यक्तीकडून पैशांची वसूली करू शकत नाही. वारसांकडून कोणतीही वसूली केली जाऊ शकत नाही.
वाहन लोनसाठी काय आहे नियम?
वाहनकर्ज होम लोनसारखं सुरक्षित कर्ज आहे. कर्ज घेऊन वाहन खरेदी केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर घरच्यांना कर्ज फेडण्याची विनंती केली जाते. जर बँक कर्ज फेडलं नाही तर गाडी जप्त केली जाते. गाडी विकून कर्ज वसूल केलं जातं.