मुंबई | 3 जानेवारी 2024 : देशाची आर्थिक राजधानी मोहमयी मायानगरी मुंबईला प्रसिध्द असण्यामागे येथील बॉलीवूड हस्तींच्या वास्तव्यालाही जबाबदार मानले जाते. मुंबईतील जुन्या जमान्याचे सुपरस्टार जुहू किंवा वांद्रेच्या समुद्रकिनारी बंगले घेऊन रहात होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे जुहूतील बंगले असो वा सुपरस्टार राजेश खन्ना यांचा बंगला प्रत्येक सुपरस्टारने मुंबईत आपले स्टारडम जपण्यासाठी बंगलेच खरेदी केले होते. परंतू आताच्या पिढीतील सुपरस्टार बंगला खरेदी करण्याऐवजी मुंबईतील आलिशान परिसरात बंगल्याऐवजी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करुन रहाण्याला प्राधान्य देत आहेत. या स्टारमंडळींनी बंगल्या ऐवजी आता फ्लॅटना पसंती देण्याचे कारण काय ? असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पाहूयात काय आहेत कारणे ?
बॉलिवूडच्या जुन्या पिढीतील स्टार बिग बी अमिताभ यांच्या पासून रेखा, धर्मेंद्र, राजेश खन्ना, आणि यश चोपडा कुटुंबिय, अनिल कपूर ते अगदी शाहरुख खान यांचे मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी आलिशान बंगले आहेत. परंतू सध्याचे सुपरस्टार दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, विराट कोहली- अनुष्का शर्मा, कपिल शर्मा आणि कार्तिक आर्यन आदी हायराईस सोसायट्यांमधील फ्लॅट्समध्ये रहात आहेत.
प्रॉपर्टी कंन्सल्टंट नाईट फ्रॅंकच्या हाऊस अफॉर्डबिलीटी इंडेक्सच्या मते मुंबई हे रहाण्यासाठी देशातील सर्वात महागडे शहर आहे. तर एनारॉकच्या एका रिपोर्टनूसार देशातील सर्वात महागडी रहिवासी निवासस्थाने वरळी, ताडदेव आणि महालक्ष्मी हा मुंबईतील परिसर आहे. म्हणजेच मुंबईत स्वत:ची जागा विकत घेऊन स्वतंत्र घर बांधणे प्रत्येकाला शक्य नाही. हे एक कारण झाले. परंतू अभिनेता जॉन अब्राहम याने लिकींग रोडवर स्वत:चा नवीन बंगला खरेदी केला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
तुम्ही मुंबईला गेला तर सुपरस्टारचा अमिताभ बच्चन यांचा जुहूस्थित प्रतिक्षा किंवा जलसा बंगला पाहायला नक्की जाता. तर कपूर खानचा पृथ्वी हाऊस देखील तुम्ही ऐकून असाल. परंतू हे बंगलेही समुद्र किनाऱ्याच्या थेट जवळ नाहीत. परंतू मुंबईत रहाणाऱ्या बड्या हस्तींची समुद्र किनाऱ्यावर घर हवे अशी इच्छा असते. सुपरस्टार शाहरुख खान याचा मन्नत बंगला समुद्र किनाऱ्यावर आहे.
अशावेळी नवीन सुपरस्टार बंगल्या ऐवजी सी-फेसिंग अपार्टमेंट विकत घेण्याला प्राधान्य देत आहेत. मुंबईत उंच गगनचुंबी इमारतीतून समुद्र किनारा दिसत असल्याने अशा इमारतीत आलिशान फ्लॅट घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळे सुर्यास्त आणि सु्र्योदय देखील पाहायला मिळत असल्याने अशा इमारतीतील फ्लॅटना प्राधान्य दिले जाते. देशातील सर्वात श्रीमंत उद्योपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सुर्यप्रकाश मिळण्यासाठी एंटीलिया निवासस्थान उंच केल्याचे म्हटले होते.