आई की मी?…प्राजक्ताच्या या प्रश्नावर पृथ्वीक प्रतापच्या उत्तरानंतर तिने लग्नासाठी होकार दिला
हस्यजत्रेतील अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकुळ यांच्या लग्नाची कहाणी अनोखी आहे. प्राजक्ताने लग्नापूर्वी पृथ्वीकला एक प्रश्न विचारला ज्या उत्तरावरून तिने लगेचच लग्नाला होकार दिला.
‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याचे नुकतंच प्राजक्ता वायकुळ हिच्यासोबत लग्न झालं. पृथ्वीक आणि प्राजक्ताने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं देवदर्शनालाही जाऊन आले होते. पृथ्वीक आणि प्राजक्ता हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. अखेर यांची जोडी ही लग्नापर्यंत पोहोचली.
पृथ्वीकच्या आईसोबत प्राजक्ताची पहिली भेट
दरम्यान एका मुलाखतीवेळी प्राजक्ताने पृथ्वीकला लग्नासाठी होकार का दिला याचं कारण जेव्हा पृथ्वीकने सांगितले तेव्हापासून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहे. जेव्हा लग्नाची विचार करण्याची वेळ आली तेव्हा पृथ्वीकने प्राजक्ताची आईसोबत भेट करून दिली.
पृथ्वीकच्या आईसोबत प्राजक्तांच्या छान गप्पाही झाल्या. नंतर पृथ्वीक प्राजक्ताला घरी सोडायला बसने तिच्यासोबत निघाला. याआधी साधारण दोन-तीन महिन्यांआधी पृथ्वीकने तिला लग्नासाठी विचारलं होतं आणि प्राजक्ताला विचार करायला वेळही दिला होता.
प्राजक्ताने विचारलेला प्रश्न
आईला भेटवल्यानंतर पृथ्वीकला प्राजक्ताकडून लग्नाबाबत हो किंवा नाही असं स्पष्ट उत्तर हवं होतं. जेव्हा त्याने प्राजक्ताला याबाबत विचारलं त्यावेळी प्राजक्तानेही त्याला एक प्रश्न विचारला तेव्हा जे उत्तर पृथ्वीने दिलं ते ऐकून प्राजक्ताने लगेचच लग्नासाठी होकार कळवला.
प्राजक्ताने पृथ्वीकला एक साधा प्रश्न विचारला होता की, “जर कधी तुला तुझी आई आणि मी यातील एकाला निवड करण्याची वेळ आली, तर तू कुणाला निवडशील?” प्राजक्ताच्या या प्रश्नानंतर पृथ्वीक बराच वेळ शांत होता. त्यानंतर त्याने उत्तर दिलं की “दोघींमधून एकाला निवडणं कठीण आहे. तू प्रश्न फार अवघड विचारला आहेस. मला सगळं मान्य असेन, पण आईला नाही सोडणार” असं उत्तर पृथ्वीकने दिलं
पुढे तो म्हणाला “जर आईसोबत पुढे जाऊन काही अडचण जाणवली, तर एक वेळ आपण आपलं नातं थांबवू, कारण बाहेरुन तुला ती प्रॉब्लेम वाटत असेल, पण ती माझ्यासाठी कधीच प्रॉब्लेम नाही. मी आयुष्यभर आईसोबत राहीन”. पृथ्वीकचे हेच उत्तर प्राजक्ताला मनापासून आवडलं.
पृथ्वीकचे विचार म्हणजे प्राजक्ताच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
पृथ्वीने दिलेल्या उत्तराने प्राजक्ताला समाधान वाटले. पृथ्वीकच्या उत्तराबद्दल ती म्हणाली की, “जर तो माझ्यासाठी आईला सोडत नाहीये याचा अर्थ नक्कीच तो इतर कुणासाठीही मला सोडणार नाही.” पृथ्वीकच्या एका उत्तराने प्राजक्ताला तिच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याचं तिने म्हटलं. पुढे प्राजक्ताने हसत आणि लाजत त्याला लग्नासाठी होकार दिला.