मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. मात्र या प्रमोशनदरम्यान कुठेच अभिनेता सैफ अली खान दिसला नाही. दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते भूषण कुमार यांच्यासह अभिनेता प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे हे चित्रपट प्रमोशनच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र सैफने कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. यावरून आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सैफला मुद्दाम या प्रमोशनपासून लांब ठेवण्यात आल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.
‘सेफ (Safe) प्ले करण्यासाठी ही युक्ती लढवली आहे’, असा उपरोधिक टोला एका युजरने लगावला. तर ‘प्रमोशनदरम्यान सैफने बेधडक वक्तव्य केलं तर सगळाच प्लॅन फ्लॉप होईल’, असा अंदाज दुसऱ्याने वर्तवला आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सैफने नकारात्मक वक्तव्य केलं होतं, त्याचाही संदर्भ काही युजर्सनी दिला आहे. “तथ्यांशी छेडछाड करून चित्रपट बनवण्याचा आजकाल ट्रेंड बनला आहे”, असं तो त्यावेळी म्हणाला होता. इतकंच नव्हे तर ‘आदिपुरुषच्या चित्रपटादरम्यान जय श्रीरामच्या घोषणा झाल्या तर सैफ त्याच्या धर्मामुळे असं काही करणार नाही. म्हणूनच त्याला प्रमोशनपासून लांब ठेवलंय’, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने लंकेश रावणाची भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. काही दिवसांपूर्वी जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा दिग्दर्शकांनी सावध पाऊल उचलल्याचं पहायला मिळालं.
याआधी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये साधूच्या वेशातील रावणाची एक झलक पहायला मिळाली. त्यानंतर थेट शेवटी काही सेकंदांसाठी सैफ अली खानचा लूक पहायला मिळाला. मात्र ट्रेलरमध्ये लंकेशचा पूर्ण लूक दिसू नये, याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकांनी घेतली होती. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. टीझरमधील रावणाच्या लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.