सध्याच्या डिजिटल विश्वात अनेकदा लोकांची ऑनलाइन फसवणूक होते. ऑनलाइन फ्रॉडच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेकदा कंपन्यांकडून ऑनलाइन फसवणुकीविरोधात कॉलसुद्धा येतात. मात्र इशारा मिळाल्यानंतरही अनेकजण विविध फसवणुकीचे शिकार होतात. ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीसोबत नुकतीच अशी घटना घडली. टीव्ही अभिनेत्री नुपूर जोशीसोबत (Nupur Joshi) सायबर फसवणूक (Cyber Fraud) झाली.
नुपूर जोशीला सोशल मीडिया अकाऊंट व्हेरिफाय करण्याचा मोह महागात पडला. नुपूरला तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाय करून हवा होता. अकाऊंट व्हेरिफाय झाल्यानंतर त्यावर ‘ब्लू टिक’ येतो. यासाठी तिने तिचं आयडी प्रूफ देऊन टाकलं. मात्र नंतर तिला तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.
या फसवणुकीबाबत नुपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडिया अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी मी माझे पुरावे दिले असं तिने यात सांगितलंय. ‘मी माझं इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती. ही बाब कोणालाच माहीत नव्हती. मला वाटलं की मी इन्स्टाग्रामच्या टीमशी संवाद साधतेय. मात्र तो हॅकर निघाला’, असं तिने स्पष्ट केलं.
इन्स्टाग्रामच्या टीमशी आपला संपर्क होतोय असंच नुपूरला वाटत होतं. हॅकरकडून तिला एक ईमेल आयडी मिळाला. संबंधित हॅकरने तिच्याकडे सरकारी आयडी प्रूफ मागितले. नुपूरनेही ते सर्व पुरावे त्या ईमेल आयडीवर पाठवले. मात्र सत्य कळल्यानंतर तिला मोठा धक्का बसला.
नुपूर शर्मा ही गेल्या 10 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करतेय. “मला ब्लू टिकचा मोह कधीच नव्हता. नुकतंच माझ्या मित्रमैत्रिणींनी मला त्याचं महत्त्व सांगितलं. माझ्या नावावरून कोणी फेक किंवा बनावट अकाऊंट उघडू नये यासाठी मी घाई केली. मात्र प्रत्यक्षात भलतंच घडलं”, असं ती म्हणाली.