Holi 2024 | रंगांचा उत्सव येऊन ठेपलाय दारावर, होळीविषयी ही रोचक माहिती आहे का?
Holi 2024 | रंगोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. होळीच्या विविध रंगात सर्वच जण नाहून निघतात. पण होळीविषयी ही रंजक आणि रोचक माहिती आहे का? होळीचा पहिला उल्लेख कोणत्या जुन्या ग्रंथांत आहे?
नवी दिल्ली | 6 March 2024 : भारताच्या प्रमुख सणांमध्ये होळीचा समावेश होतो. होळी म्हटलं की रंगांची उधळण आठवतं. संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई, अबालवृद्ध आणि गल्लोगल्लीत सुरु असलेली रंगांची बरसात आठवते. केवळ देशातच नाही तर जगातही भारतीय लोक होळी साजरी करतात. वसंत ऋतूचे आगमन होताच होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळी हे थंडी सरण्याचे पण प्रतिक आहे. देशातील अनेक धार्मिक शहरात या दिवशी लठ्ठमार होळी व इतर ही अनेक परंपरा आढळून येतात. काही भागात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यात येते.
होळीविषयी जाणून घ्या काही रोचक माहिती आणि त्यासंदर्भातील माहिती
- जुनी परंपरा : होळी हा जुन्या सणांपैकी एक पारंपारिक सण आहे. होळीची सुरुवात नेमकी कधी झाली याविषयीची अचूक माहिती हाती लागत नाही. पण काही तज्ज्ञांच्या मते, होळीचा उल्लेख प्राचीन हिंदू धर्मग्रथांपैकी, ऋग्वेदात आढळतो.
- पुराणातील कथा : होळीसंदर्भात पुराणात दोन प्रमुख कथा आढळून येतात. पहिली कथा हिरण्यकश्यप आणि प्रह्लाद यांची आहे. वाईटावर चांगुलपणाचा विजय यातून दिसतो. दुसरी गोष्ट कामदेव आणि रती यांची आहे. ही कथा प्रेम आणि वासना यांच्याशी संबंधित आहे.
- रंगांचा उत्सव : होळीला रंगांचा उत्सव पण म्हणतात. यादिवशी एकमेकांना रंग लावण्यात येतो. रंग, अबीर आणि गुलालाची उधळण होते. लोक भक्तीगीतात तल्लीन असतात. आता त्याचे रुप बॉलिवूड गाण्यांनी घेतले आहे. हा उत्सव सामाजिक समरसता आणि बंधुतेचे प्रतिक आहे.
- होळीचे दहन : होळीच्या एक दिवस अगोदर होलिकाचे दहन करण्यात येते. होलिका नावाच्या राक्षसणीचे प्रतिकात्मक दहन करण्यात येते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे हे प्रतिक आहे.
- धुळवड : होळीच्या मुख्य दिवसाला धुळवडीच्या नावाने ओळखले जाते. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. नाचत, गात हा उत्सव साजरा करतात. या दिवशी गोडधोड करण्यात येते.
- प्रादेशिक विविधता : होळी पूर्ण भारतात साजरी करण्यात येते. पण देशातील प्रत्येक राज्यात तिचे स्वरुप बदलते. प्रत्येक क्षेत्रात होळीचे विविध रंग आहेत. पश्चिम बंगालमध्ये होळीला “बसंतोत्सव” तर मणिपूरमध्ये “याओसंग” नावाने ओळखले जाते.
- वैश्विक उत्सव : होळी आता केवळ भारतापूरता मर्यादीत नाही. जगभरात हा सण साजरा होतो. तो वैश्विक उत्सव झाला आहे. ज्या ज्या देशात भारतीय लोक आहेत. त्या ठिकाणी होळी साजरी करण्यात येते. लंडन, न्यूयॉर्क, नेपाळसह इतर अनेक शहरात होळी साजरी करण्यात येते.
- प्रत्येक रंगाला अर्थ : होळीत वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक रंगाला काही ना काही अर्थ आहे. प्रत्येक रंगाचे काही तरी सांगणे आहे. लाल रंग हा आनंद आणि प्रेमाचे प्रतिक आहे. पिवळा रंग सकारात्मक आणि उम्मेदीचा तर हिरवा रंग हा नवनिर्मिताचे प्रतिक आहे.
- पर्यावरणाचा विचार : होळीत पर्यावरणाविषयी जागरुकता आणण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. नैसर्गिक रंगांच्या वापरावर जोर देण्यात येत आहे. तर पळस आणि तत्सम झाडे लावण्याचा उपक्रम पण हाती घेण्यात येत आहे. पर्यावरण जागरुकतेसाठी होळीचा खुबीने वापर होत आहे.
- सामाजिक घुसळण : होळीच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येऊन हा सण साजरा करतो. सामजिक समता, बंधुता वाढविण्यासाठी, समाजात आनंद वाढविण्यासाठी होळी मोठी भूमिका निभावते. यामध्ये काही सामाजिक कुरबुरी पण दूर होतात. मनातील अढी दूर करण्यासाठी हा सण साजरा होतो.
हे सुद्धा वाचा