इथं बाप्पाचा प्रसाद घ्यायला नोटांचे बंडलच मोजावे लागतात.. तळ हातावर नाही, डोक्यावर घ्यावा लागतो…
हैदराबादेत गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नाक्या-नाक्यांवर पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. आज 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राप्रमाणेच हैदराबादेत सार्वजनिक सुटी देण्यात आली आहे.
दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने पूजलेल्या बाप्पाच्या विसर्जनाचा (Bappa Visarjan) आजचा दिवस आहे. गणेश भक्त भावनिक झाले आहेत. निदान निरोपाच्या दिवशी तरी बाप्पाचा प्रसाद घरी घेऊन जावा, अशी इच्छा अनेकांची असते. पण हैदराबादेतल्या (Hyderabad) एका गणपतीच्या प्रसादाची (Ganpati Prasad) किंमत ऐकाल तर थक्क व्हाल. इथल्या बाप्पाच्या लाडूची किंमती लाखोंच्या घरात आहे. नुकताचा त्याचा लीलाव झाला. 24 लाख 60 हजार रुपयांत तो विकला गेला. पण हा प्रसाद तळहातावर पेलण्यासारखा नाही. त्याचं वजन तब्बल 21 किलो एवढं होतं…
हैदराबादमधील प्रसिद्ध बालापूर गणपतीच्या प्रसादातील लाडूची विक्री झाली. तो विक्रमी किंमतीत विकला गेला. 24 लाख 60 हजार रुपये एवढी सर्वाधिक किंमत या प्रसादाला मिळाली.
तेलंगणा राष्ट्र समिती नेते व्ही लक्ष्मा रेड्डी यांनी हा लिलाव जिंकला. दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी हा लिलाव होत असतो.
यापूर्वी 2021 मध्ये लाडूसाठी 18.90 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. ती वायएसआर काँग्रेस आमदार आर व्ही रमेश यादव यांनी जिंकली होती. 2019 मध्ये लाडूसाठी 17 लाख 60 हजार रुपयांची बोली लावण्यात आली होती.
2018 मध्ये इथला लाडू 16 लाख 60 हजार रुपयात लीलावात विकला गेला होता. 2020 मध्ये कोरोना संकटामुळे लीलाव रद्द करण्यात आला होता.
कोरोना काळात बालापूर गणेशाचा लाडू मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
दरवर्षी लिलावातून आलेल्या रकमेपैकी काही रक्कम पुढच्या वर्षीच्या गणपती उत्सवासाठी राखून ठेवली जाते. तर काही रक्कम बालापूरमधील सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केली जाते.
लाडूचा इतिहास काय?
हैदराबादेत या लाडूच्या लिलावामागे रंजक इतिहास आहे. 1994 पासून ही परंपरा आहे. एका भक्ताने 450 रुपयात सर्वात आधी बालापूर गणेशाचा लाडू खरेदी केला. त्यानंतर दरवर्षी लाडूचा लीलाव करूनच तो विकला जातो.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लोकही इथे बोली लावण्यासाठी येतात. ज्याच्याकडे हा लाडू येतो, तो नशीबवान समजला जातो.
हैदराबादेत गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नाक्या-नाक्यांवर पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. आज 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राप्रमाणेच हैदराबादेत सार्वजनिक सुटी देण्यात आली आहे.
गणपती विसर्जनासाठी हैदराबाद, साइबराबाद आणि राचकोंडा या तिन्ही ठिकाणी तणाव स्थिती उद्धवू नये, यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.