Kolhapur Navratri 2023 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात असा साजरा केला जातो नवरात्रोत्सव, दिली जाते तोफेची सलामी
मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे. अंबाबाई मंदिरात आज सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. अनेक भक्त दूरवरून देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
कोल्हापूर : आजपासून देशभरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. साडेतीन शक्तिपीठा पैकी एक असलेले कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव (Kolhapur Navratri 2023) निमीत्त्य जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मंदिराला आकर्षक अशी रोशनाई करण्यात आली आहे. दरवर्षी नवरात्रीत लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. भक्तांची गैरसोय होवू नये यासाठी मंदिर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे. अंबाबाई मंदिरात आज सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. अनेक भक्त दूरवरून देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. थोड्याच वेळात मंदिरात घटस्थापना होणार आहे. घटस्थापनेनंतर तोफेची सलामी देण्याची प्रथा आहे. घटस्थापना विधी पूर्ण झाला हे भाविकांना कळण्यासाठी तोफेची सलामी देण्यात येते.
नऊ दिवस नऊ प्रकारची पुजा
नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पुजा होणार आहे. कोणत्या दिवशी कोणती पूजा होणार आहे ते जाणून घेऊया.
आज रविवारी प्रतिपदेला पारंपारीक बैठी पूजा पार पडेल
सोमवारी द्वितीयेला महागौरी पूजा
मंगळवारी तृतीयेला कामाक्षी देवी पूजा
बुधवारी चतुर्थीला श्री कुष्मांडा देवी पूजा
गुरूवारी पंचमीला पारंपारीक गजारूढ पूजा
शष्ठीला श्री मोहिनी अवतार पूजा
शनिवारी श्री नारायणी नमस्तुते पूजा
अष्टमीला पारंपारीक महिषासुरमर्दिनी पूजा
सोमवारी नवमीला दक्षीणामूर्तीरूपिणी पूजा
पारंपारीक रथारूढ पूजा
विजयादशमीच्या दिवशी दसरा चौकात करण्यात येणार देवीची पूजा
अष्टमीला मंदिराभोवती रांगोळ्यांनी रस्ते सजवले जाणार आहेत. देवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवून आकर्षक रोषणाईत शहर प्रदक्षिणा केली जाईल आणि शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीची पालखी कोल्हापूरच्या दसरा चौकात पोहोचेल. तिथे श्रीमंत राजर्षी शाहू महाराज घराण्याशी संबंधित घराण्याचे वारस पारंपारीक वेशभुषेत देवीची पूजा करतील. नंतर सीमोल्लंघन केले जाईल. हा दसरा उत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. हा पारंपारीक सोहळा पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते.
मंदिराशी संबंधीत पौराणिक कथा
देवीचे मंदिर अंदाजे 1700 ते 1800 वर्षे जुने आहे. मंदिरात द्वारपालांच्या दोन भव्य मूर्तींचीही एक कथा आहे. या मूर्ती दोन असुरांच्या असल्याचे सांगितले जाते. या असुरांनी एका रात्रीत हे भव्य मंदिर बांधले होते. तथापि, या कथेशिवाय एक कथा आहे. तैलन नावाच्या व्यक्तीने 1140 च्या सुमारास देवीच्या समोर महाद्वार बांधला होता, असे मानले जाते. प्राचीन शिलालेखानुसार- मंदिराचा पूर्व दरवाजा तत्कालीन सरदार दाभाडे यांनी बांधला होता. दुसरीकडे, देवी महालक्ष्मीसमोरील गरुड मंडप दाजी पंडित यांनी 1838 ते 1842 दरम्यान बांधला होता. आदिलशहाच्या काळात शहरातील कपिलतीर्थ परिसरात राहणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात देवीची मूर्ती लपवून ठेवली जात होती. पुढे विजयादशमीच्या दिवशी देवीची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याचे सांगितले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)