Holi 2023 : होळीच्या रंगामुळे त्वचेचा रंग काळवंडलाय ? या होममेड मास्कचा वापर करून तर पहा, चमकेल तुमची त्वचा
बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांशिवाय तुम्ही घरगुती उपायांद्वारेही त्वचेची काळजी घेऊ शकता. होळीनंतर तुमच्या चेहऱ्याची चमक परत येण्यासाठी कोणते घरगुती फेस मास्क वापरू शकता ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली : होळी (Holi 2023) साजरी करताना रंगांचा वापर सामान्य आहे. मात्र या रंगांमध्ये नानाविध रसायने आणि केमिकल्स (chemicals) असतात. पण हे माहीत असूनही अनेक लोकं त्या रंगाचा वापर करतच होळी साजरी करतात. बाजारात मिळणारे रंग वापरल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव (dry skin) तर होतेच पण त्याचसोबत त्वचेवर पुरळ आणि लालसरपणाही येतो. अशा परिस्थितीत होळी खेळल्यानंतर त्वचेला खाज येणे, रॅशेस येणे यामुळे आपल्याला चिडचिडेपणा जाणवू शकतो. सिंथेटिक रंगांनी होळी खेळली असेल तर त्वचेची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांशिवाय तुम्ही घरगुती उपायांद्वारेही त्वचेची काळजी घेऊ शकता. घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही त्वचेची हरवलेली चमक परत आणण्याचा प्रयत्न करू शकता. घरी कोणते फेसपॅक तयार करू शकता ते जाणून घेऊया.
दह्याचा फेस मास्क
चमकदार त्वचा हवी असेल तर त्यासाठी त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या स्वयंपाक घरातील दही हे केवळ सेवनासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर असते. दही हे त्याच्या हायड्रेटिंग फायद्यांसाठी ओळखले जाते. होळीनंतर त्वचेची काळजी घेताना तुम्ही दह्याचा फेस मास्क बनवू शकता. एका भांड्यात 3 ते 4 चमचे दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. हे एकत्र करून हा मास्क चेहरा आणि हाताच्या त्वचेवर लावा. वाळल्यानंतर कोमट पाण्याने धूवून टाकावे.
हळदीचा फेस पॅक
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक घटकांनी समृद्ध असलेल्या हळदीला देशी औषध म्हणतात. रासायनिक रंग काढून टाकण्यासाठी हळद अतिशय प्रभावी आहे. तसेच ती त्वचेवर चमक येण्यास उपयुक्त आहे. एका भांड्यात दोन चमचे हळद आणि 2 मोठे चमचे मुलतानी माती घ्यावी. पेस्ट बनवण्यासाठी त्यात थोडं गुलाबजल टाका आणि नंतर त्वचेवर लावा. वाळल्यानंतर तुमचे हात साध्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि मॉयश्चरायझर लावा.
केळं आणि मध यांचा फेस मास्क
रसायनयुक्त रंगांमुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, अशा परिस्थितीत ती पुन्हा मऊ अथवा सॉफ्ट होणे आवश्यक आहे. त्वचेचा सॉफ्टनेस आणण्यासाठी तुम्ही मध वापरू शकता. एक केळं मॅश करा आणि त्यात किमान दोन चमचे मध घाला. ते त्वचेवर लावा आणि वाळेपर्यंत तसेच राहू द्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या मास्कमध्ये दूध देखील टाकू शकता. त्वचेवर जिथे जिथे रंग लागला असेल तिथे हा मास्क लावा आणि वाळल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.