होळीच्या सणाला ‘टिमकी’चं वादन! कुठे होते साजरी आगळी-वेगळी होळी, जाणून घ्या
अवघ्या काही तासांवर होळी हा सण आला आहे. त्यामुळे त्याची लगबग सुरू आहे. नाशिकच्या येवल्यात सध्या वेगळं वातावरण आहे. आगळी वेगळी साजरी केली जाणाऱ्या होळीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
येवला ( नाशिक ) : प्रांत बदलला की भाषा, रूढी – परंपरा देखील बदलतात. त्यामुळे सणवार देखील वेगळ्या पद्धतीने साजरी ( Festival Celebration ) करण्याची परंपरा आहे. होळीला अनेक ठिकाणी रंगाची उधळण केली जाते. मात्र, महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. रंगाची उधळण न करता गोवऱ्या, लाकूड यांच्या माध्यमातून होळी ( Holi ) पेटवली जाते. तिला पुरणपोळीचा नैवद्य ठेवून पूजाअर्चा केली जाते. त्यानंतर धूलिवंदनला धूळवड खेळली जाते. त्यामुळे गावागावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होणारी होळी नाशिकच्या येवला शहरासह तालुक्यात वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. होळी सणाला होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते.
गाव बदललं की रूढी आणि परंपरा बदलतात. तसे सणवार असल्या की तेथील संस्कृती देखील वेगळी असते. होळी सणाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे. तशी नाशिकमध्ये एक खास संस्कृती आहे. होळी सणाला असलेली ही परंपरा संपूर्ण राज्यात उठवून दिसते.
अवघ्या काही तासांवर होळी हा सण आला आहे. त्यामुळे त्याची लगबग सुरू आहे. नाशिकच्या येवल्यात सध्या वेगळं वातावरण आहे. होळी सणाकरिता लागणारी टिमकी बनवण्याची लगबग जवळपास पूर्ण झाली असून मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे.
होळी सणाच्या दिवशी होळी पुढे टिमकी वाजवण्याची परंपरा आहे. हीच टिमकी बनविण्यात कारागीर काही महिन्यांपासून व्यस्त होते. यावेळी कारागीराने टिमक्यांवर कांदा प्रश्नी संदेश रेखाटत सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
कांद्याला हमीभाव द्या, कांद्याला अनुदान मिळावे, कांदा भावातील घसरण थांबवा, नाफेडने कांदा खरेदी करावा असे विविध कांदा प्रश्नी संदेश या टिमक्यांवर या कारागिरीने रेखाटले आहे. यावर्षी कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने टिमकीच्या किमतीतही वाढ झाली आहे.
बाजारात चायनीज टिमक्या आल्या असल्याने पारंपारिक टिमक्यांची मागणी घटलीये. तरी स्थानिक कारागिरांना, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे यासाठी पारंपारिक टिमक्यांची खरेदी करावी असे आवाहन केलं जात असून मोठी लगबग येवल्यात पाहायला मिळत आहे.
त्यामुळे टिमकीचे वादन आणि होळी हे समीकरण येवला शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे होळी सण आला की टिमकी विक्री आणि खरेदी करण्याची जोरदार लगबग येवल्यात पाहायला मिळत असून कोरोनाचे सावट यंदाच्या वर्षी नसल्याने मोठा उत्साह नागरिकांमध्ये दिसून येत आहे.