कल्याण डोंबिवली नव्हे, ही तर खड्ड्याण डोंबिवली मनपा, मनसेकडून नामकरण, खड्ड्यात केक कापला
कल्याण डोंबिवली नव्हे, ही तर खड्ड्याण डोंबिवली मनपा आहे, अशी टीका मनसेने केली आहे. (MNS Agitaion KDMC Potholes)
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेने महापालिकेच्या 37 व्या वर्धापन दिनी खड्डय़ात केक कापून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. (MNS Agitaion KDMC Potholes) ही महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका नसून ही तर खड्ड्याण डोंबिवली महापालिका असल्याची बोचरी टीका मनसेने केली.
आंदोलनापूर्वी मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीवरुन पडून जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. मात्र तश्या अवस्थेत देखील पोमेणकर हे आंदोलनात सहभागी झाले होते.
मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सचिन कस्तूर, सागर जेधे आदी मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतील टिळक चौकाजवळ रस्त्यात केक कापून महापालिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महापालिकेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविण्याची मागणी मनसेच्या वतीने गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनाकडे केली जात आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. पावसाने उघडीक दिली नसल्याने खड्डे बुजविले जात नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात होते. आत्ता पाऊसाने उघडीप दिली असली तरी खड्डे बुजविले जात नाहीत. महापालिकेचा आज 37 वर्धापन दिन असला तरी त्यांच्या विकासाचा प्रवास हा उलटा आहे. तो प्रवास खड्डेमय रस्त्यातून आहे, असं सांगत मनसेच्या वतीने हे आजचे आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनापूर्वी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाच्या ठिकाणी दुचाकीवरुन येत असलेले मनसेचे कार्यकर्ते प्रशांत पोमेणकर हे खड्डा वाचवत असताना त्यांचा अपघात झाला.
खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात पोमेणकर यांचा दुचाकीवरुन तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांच्या पायाला झालेल्या जखमेवर डॉक्टरांनी दहा टाके टाकले आहेत. पायाला बॅण्डेज बांधून पोमेणकर हे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्याच हस्ते केक कापत मनसेने महापालिकेचा निषेध व्यक्त करणारं आंदोलन केलं. (MNS Agitaion KDMC Potholes)
संबंधित बातम्या
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी, कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकाने स्वखर्चातून खड्डे बुजवले
ठाणे, कल्याण, सातारा, वसई-विरारमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य