पपई खाणे चांगले, पण गर्भवतींसाठी ठरते विषासमान, हे आजार असणाऱ्यांनीही करू नये सेवन
Side Effect of papaya : पपई आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तिच्या सेवनाने शरीर निरोगी आणि स्वस्थ राहत. परंतु त्याचे जास्त सेवन करणे आणि विशिष्ट परिस्थितीत ते खाणे हानिकारक ठरू शकते. गरोदरपणात पपईचे सेवन करू नये.
नवी दिल्ली : पपई (Papaya)आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामध्ये ऊर्जा, चरबी, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, मॅंगनीज, तांबे, सेलेनियम, जीवनसत्त्वे यांसह अनेक पोषक तत्वे असतात. अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स (anti oxidents) असल्यामुळे पपई शरीरात फ्री रॅडिकल्स होण्यापासून रोखते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. यासोबतच पपई खाल्ल्याने वजनही कमी होते. पपईमध्ये हृदय मजबूत करण्याची क्षमता देखील आहे.
पण जास्त पपई खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते (Side Effects of Papaya) हे तुम्हाला माहीत आहे का? यामुळेच काही लोकांनी पपईचे सेवन कमी केले पाहिजे. असे काही आजार आहेत ज्यामध्ये पपई खाल्ल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. गर्भवती महिलांसाठीही याचे सेवन धोकादायक मानले जाते.
कोणत्या परिस्थितीत पपईचे सेवन करू नये ते जाणून घेऊया.
1) ॲलर्जी असल्यास
WebMD मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, कधी कधी पपईमुळे काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे सूज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ उठणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पपई खाल्ल्यानंतर मळमळ किंवा चक्कर येत असल्यास पपई खाऊ नये. तथापि, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही.
2) गरोदर महिलांनी चुकूनही करू नये सेवन
गरोदरपणात चुकूनही पपईचे सेवन करू नये. कच्च्या पपईमध्ये लेटेक्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे गर्भाशयाच्या भिंतीमध्ये आकुंचन वाढू शकते. पपईमध्ये असलेले पपेन शरीरातील पेशींच्या पडद्याचे नुकसान करते. ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यास नुकसानकारक ठरू शकते. यामुळेच गर्भवती महिलांना कच्ची पपई न खाण्यास सांगितले जाते.
3) उलटी होत असेल तर
पपई खाल्ल्याने अनेक वेळा मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. कच्च्या पपईमध्ये लेटेक्स असते, ज्यामध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास अन्ननलिकेचे नुकसान (esophagus) होऊ शकते आणि मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. मात्र हे सर्वांसोबत घडत नाही.
4) पचनाची समस्या
पपई साधारणपणे पचनासाठी खूप चांगली मानली जाते. पपईमध्ये भरपूर फायबर असते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते, परंतु ज्यांना आधीच पचनाची समस्या आहे त्यांचे पचन देखील बिघडू शकते. पपईमध्ये असलेल्या लेटेक्समुळे देखील पोटदुखी होऊ शकते. यामुळे अतिसार देखील होऊ शकतो. त्यामुळे पपईचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.