सिगारेटचा एक झुरका पडला भलताच महागात, तरूणाने आवाजच गमावला !
स्मोकिंगचे व्यसन जीवघेणे आहे. एका तरूणाला सिगारेटचा झुरका घेतल्यामुळे आवाज गमवावा लागल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
नवी दिल्ली : तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान करणे (smoking) हे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. या संदर्भात शासनातर्फे जनजागृती कार्यक्रमही राबवला जातो. टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातूनही लोकांना जागरूक केले जाते. मात्र त्यानंतरही बहुतांश लोक तंबाखू आणि धूम्रपानाचे व्यसन सोडत नसल्याने त्यांना धोकादायक आजारांना (harmful diseases) सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिगारेटचा एक झुरका घेताच एका तरुणाला त्याचा आवाज (man lost voice after one smoke) गमवावा लागला. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण ?
रिपोर्ट्सनुसार, गुरे चारणाऱ्या या तरुणाला अज्ञातांनी सिगारेट दिली. त्या तरुणाने सिगारेटचा एक झुरका घेताच त्याचा आवाजच गेला. या तरूणावर गुजरातमधील राजकोट येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिगारेट ओढल्यानंतर तरुणाचा आवाड गेल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसले असून धूम्रपान करणाऱ्या लोकांनाही धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, धूम्रपानाच्या दुष्परिणामांवर दीर्घकाळ संशोधन केले जात आहे. यामध्ये अनेक गंभीर आजारांबाबत सांगण्यात आले आहेत ज्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. पण, धूम्रपानानंतर आवाज गमावण्याची ही घटना दुर्मिळ आहे.
याबाबत तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापर्यंत धूम्रपान करत असेल तर त्या व्यक्तीचा गळा खराब होऊ शकतो. मात्र सिगारेट अशा प्रकारे आवाजाला हानी पोहोचवत नाही. याला इतरही कारणे आहेत, पण त्याचा परिणाम स्वरयंत्रावर झालेला नाही.
दरम्यान धूम्रपान आणि त्याचा आवाजावर होणारा परिणाम यांच्यातील संबंध ओळखण्यासाठी 2020 मध्ये एक अभ्यास करण्यात आला. या संशोधनात असे आढळून आले की, जर तुम्ही जास्त सिगारेट ओढत असाल तर त्यामुळे व्होकल कॉर्ड न्युकोस ही सुकते अथवा कोरडी होते. तसेच जास्त धूम्रपान केल्याने व्होकल कॉर्डमध्ये सूज येऊ शकते, ज्यामुळे थुंकी, खोकला आणि व्होकल कॉर्डमध्ये जळजळ होणे, असा त्रास सुरू होतो. यामुळे तुमचा आवाज देखील बदलू शकतो. याबाबत संशोधकांचे म्हणणे आहे की, अति धूम्रपानामुळे व्होकल कॉर्डचे वजनही वाढते, त्यामुळे फंडामेंटल फ्रीक्वेन्सीही कमी होते.
अभ्यासात असेही आढळून आले आहे की धूम्रपान केल्याने अधिकतम फोनेशनची वेळ (पुन्हा श्वास घेण्यापूर्वी एका श्वासात तुम्ही किती वेळ बोलू शकता) कमी होते. अभ्यासात असे म्हटले आहे की यामुळे फुफ्फुसाचे कार्य (श्वास पुरवठा आणि स्वर शक्ती) कमकुवत होऊ शकते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दीर्घकाळ धूम्रपान केल्याने स्वरयंत्रात जळजळ, संसर्ग आणि कर्करोगाचा विकास होऊ शकतो.