सुष्मिता सेनप्रमाणे नाही बनणार हृदयविकाराचे रुग्ण ! फक्त या गोष्टींची घ्या काळजी
अभिनेत्री सुष्मिता सेनला नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. स्वत:चा जीव धोक्यात घालण्यापेक्षा त्याची योग्य काळजी घेऊन निरोगी जीवन जगणे कधीही चांगले नाही का ? जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला नुकताच ह्रदयविकाराचा झटका (heart attack) आला होता. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून तिने याबाबत माहिती दिली. आपली अँजिओप्लास्टिही झाल्याचे नमूद करत तिने डॉक्टरांचे आणि फॅन्स व शुभेच्छुकांचे आभार मानले. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. फिटनेस आणि डाएटची (fitness and diet) विशेष काळजी घेणाऱ्या सुष्मिताच्या बाबतीत असे घडू शकते, तर ही मोठी चिंतेची बाब आहे. हृदयाशी संबंधित आजारांमध्ये (heart disease) सातत्याने वाढ होत आहे. तणाव, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका (causes for heart disease) येऊ शकतो.
तरुण वयातच मोठ्या स्टार्सनीही हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला हे आश्चर्यकारक आहे, त्यात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, गायक के.के यांच्या नावाचाही समावेश आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालण्यापेक्षा त्याची योग्य काळजी घेऊन निरोगी जीवन जगणे कधीही चांगले नाही का ? हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो, अशा काही गोष्टी व चांगल्या सवयींबद्दल जाणून घेऊया आणि निरोगी राहूया.
हेल्दी डाएट
निरोगी राहण्याचा सर्वात पहिला नियम म्हणजे चांगला व पौष्टिक आहार. अतितिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ किंवा बाहेरचे अन्न यांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. जेव्हा कोलेस्ट्रॉल जास्त असते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते आणि अशा वेळी रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका किंवा इतर आजारांपासून दूर राहण्यासाठी दिवसातून एकदा हिरव्या भाज्या जरूर खाव्यात.
कार्ब्स इनटेक
वजन कमी करण्यासाठी किंवा स्लिम दिसण्यासाठी लोक असा आहार घेतात ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दिवसातून एकदा तरी कार्बयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. कर्बोदकांचे सेवन केल्याने शरीर निरोगी ठेवण्याचे आणि ऊर्जा देण्याचे काम करते.
मद्यपान कमी करा
वाईन किंवा बिअरची सवय सोडता येत नाही. मात्र त्याचे सेवन अतिशय घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार (WHO) हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण हे मद्यपान आहे. तुम्ही मद्यपान करणे सोडू शकत नसाल तर किमान त्याचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
धूम्रपान करणे सोडा
धूम्रपानाची सवय म्हणजेच सिगारेट ओढणे हे किती हानिकारक आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे जीवही जाऊ शकतो. धूम्रपान केल्याने हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याचा धोका असतो. धूम्रपान लगेच बंद करणे शक्य नसले तरीही हळूहळू त्याची सवय सोडवता येते.