Monkeypox : दिल्लीनंतर आता तेलंगणातही आढळला मंकीपॉक्सचा संशयीत रुग्ण; चाचणीचा अहवाल तपासणीसाठी पाठवला पुण्याला
दिल्लीचे प्रकरण ताजे असतानाच आता तेलंगणामध्ये (Telangana) देखील मंकीपॉक्सचा (Monkeypox) एक संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती नुकताच परदेशातून भारतात परतला आहे.
हैदराबाद : भारतात देखील आता मंकीपॉक्सचा प्रसार होत असल्याचे पहायला मिळत आहे. काल दिल्लीमध्ये एका 31 वर्षीय रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा अहवाल हा मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळून आला त्या व्यक्तीच्या परदेश प्रवासाची कोणतीही नोंद नाही. मात्र तरी देखील त्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. दिल्लीचे प्रकरण ताजे असतानाच आता तेलंगणामध्ये (Telangana) देखील मंकीपॉक्सचा (Monkeypox) एक संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती नुकताच परदेशातून भारतात परतला आहे. प्रवासातून परतल्यानंतर हा व्यक्ती आजारी पडला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली आहेत. मात्र या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे की नाही? हे चाचणीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या व्यक्तीच्या चाचणीचे अहवाल तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्था (NIV) कडे पाठवण्यात आले आहेत.
दिल्लीमध्ये आढळला रुग्ण
दरम्यान रविवारी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण कुठेही परदेशात गेला नव्हता तरी देखील तो पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचे वय 31 वर्ष असून, त्याच्यावर दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या व्यक्तीला सुरुवातीला ताप आला होता, त्यानंतर चेहऱ्यावर जखमा झाल्या त्यामुळे त्याची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर आज तेलंगणामध्ये जो मंकीपॉक्सचा संशयीत रुग्ण आढळून आला आहे, तो परदेशातून भारतात परतला आहे. चाचणीचा अहवाल येईलपर्यंत या व्यक्तीला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
धोका वाढला
आता कुठेतरी कोरोनाचे संकट टळले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र आता देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजरा पॉझिटिव्ह व्यक्ती अथवा प्राणी यांच्या संपर्कात आल्याने, तसेच पॉझिटिव्ह रक्त, शिंका, खोकला या माध्यमातून देखील पसरतो. व्यक्तीला आजाराची लागण झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांनंतर या आजाराची लक्षण दिसत असल्यामुळे प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.