वाढत्या प्रदूषणामुळे तुम्हालाही होऊ शकतो न्यूमोनिया, ‘ही’ आहेत लक्षणे
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली शहरात प्रदूषण झपाट्याने वाढलेले आहे. या वाढत्या प्रदूषणाने अनेक आजार होण्याची शक्यता आहे. प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम फुप्फुसांवर होत आहे.
एकीकडे थंडीचे दिवस सुरु झाले आहेत तर या कडाक्याच्या थंडीत दिल्लीसारख्या मोठ्या शहरात अधिक प्रमाणात प्रदूषणाने हाहा:कार माजवला आहे. यामुळे या वाढत्या प्रदूषणाचा त्रास जवळजवळ सर्वच लोकांना होत असल्याने अनेक आठवड्यांपासून या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु प्रदूषणाची वाढलेली पातळी कमी होत नाही. प्रदूषणामुळे लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत. काही लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. प्रदूषणाचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होतो, पण त्याचा परिणाम फुफ्फुसांवर जास्त होतो. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे लोकं न्यूमोनियासारख्या धोकादायक आजारालाही बळी पडू शकतात. अशावेळी न्यूमोनिया का होतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत आणि ती कशी टाळता येऊ शकते? ते जाणून घेऊयात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते, वाढत्या प्रदूषणामुळे न्यूमोनिया आजाराचा धोकाही वाढतो. त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता देखील कमी होऊन न्यूमोनिया होतो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, वायू प्रदूषणामुळे दरवर्षी ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, अमेरिकन लंग असोसिएशनच्या मते, वायू प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका २० ते ३० टक्क्यांनी वाढतो. प्रदूषण वाढल्याने ज्यांना आधीच न्यूमोनिया हा आजार झालेला आहे त्यांची समस्या अधिकच धोकादायक बनते.
प्रदूषणामुळे न्यूमोनिया कसा होतो?
दिल्लीतील आरएमएल रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. सुभाष गिरी सांगतात की, जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा हवेमध्ये असलेले प्रदूषणाचे छोटे कण फुफ्फुसात जातात. ते फुफ्फुसांच्या अल्व्हिओल्स (फुफ्फुसांच्या लहान ग्रंथी) खराब करतात. हे छोटे कण फुफ्फुसाचे आरोग्य क्षमता कमी करतात. फुफ्फुसे कमकुवत झाल्यामुळे त्यांच्यावर न्यूमोनिया सारखे असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस फुप्फसांत पसरले जातात आणि यामुळे व्यक्ती न्यूमोनियासारख्या आजाराला बळी पडते.
न्यूमोनियाची लक्षणे कोणती आहेत?
- खूप ताप येणे
- खोकला
- छातीत दुखणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
न्यूमोनिया होऊ नये यासाठी घ्या योग्य काळजी
- बाहेर पडण्यापूर्वी मास्क लावा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
- घराबाहेर व्यायाम करू नका
- खाण्यापिण्याची काळजी घ्या
- खोकला तीन दिवसांपेक्षा जास्त असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका