रक्तदान करताय ? त्यापूर्वी या चुका करणे टाळा, नाहीतर..
रक्तदान करण्यापूर्वी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही.

Blood Donation : आजही लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागृतीचा अभाव आहे. लोक अजूनही रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात. रक्तदान करणे ही एक चांगली सवय आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीला रक्तदान करण्याची (blood donation) गरज आहे. रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या अनेक रुग्णांना तुमच्या रक्तामुळे नवीन जीवन मिळू शकते. बरेच लोक (blood donor) रक्तदानासाठी तयार होतात, परंतु काही वेळा माहितीच्या अभावामुळे त्यांच्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
आजकाल लोकांमध्ये अशक्तपणा खूप सामान्य आहे. आहाराचा अभाव आणि संतुलित आहार न घेतल्याने आजकाल अनेकांना ॲनिमियाचा त्रास होतो. पण, काही लोकांच्या शरीरात वैद्यकीय स्थितीमुळे देखील रक्त कमी होऊ शकते. याशिवाय, रुग्णालयात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते. गर्भधारणा, अपघात आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये डॉक्टरांना अनेकदा रुग्णाला रक्त चढवावे लागते. परंतु अनेक वेळा रुग्णालयात पुरेशा प्रमाणात रक्त उपलब्ध नसल्यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा रक्तपेढ्यांकडून रक्त घ्यावे लागते.
रक्तदान करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. अनेक लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी किंवा रक्तपेढीत रक्त साठवण्यासाठी रक्तदान करतात. कारण वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. म्हणूनच आपण सर्वांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. यामुळे तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार होते आणि रक्त शुद्ध होते.
पण रक्तदान करण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदान करण्यापूर्वी काही चुका आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्या कोणत्या हे जाणून घेऊया.
रक्तदान करण्यापूर्वी शरीराला पुरेशी विश्रांती न देणे
जर तुम्ही रक्तदान करणार असाल तर आदल्या रात्री तुम्हाला चांगली आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. जेणेकरून रक्तदानाच्या वेळी तुम्ही उत्साही राहू शकाल. तुम्ही असे न केल्यास, रक्तदान केल्यानंतर तुम्हाला अधिक थकवा, चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
आरोग्याची नीट काळजी न घेणे
रक्तदान करण्यापूर्वी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला बरे आणि निरोगी वाटत नसेल किंवा सर्दी आणि फ्लू सारख्या हंगामी समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्ही रक्तदान करू नये. कारण यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. तसेच, रक्तदान करण्याच्या तुमच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
पौष्टिक आहार न घेणे
रक्तदान करण्यापूर्वी शरीराला पुरेसे पोषण देणे अत्यंत आवश्यक आहे. लोह, व्हिटॅमिन सी यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त असा आहार घ्या. जेणेकरून रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा जाणवणार नाही. तुम्ही लाल मांस, मासे, चिकन, राजमा, मसूर, पालक, नट आणि ड्रायफ्रुट्स तसेच बियांचे सेवन करू शकता.
पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे
रक्तदान करण्यापूर्वी शरीराला हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीरात ऊर्जा राहते, तसेच रक्तदान केल्यानंतर थकवा व अशक्तपणा जाणवत नाही. त्यामुळे रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी तसेच भरपूर द्रव पदार्थ पिण्याचा प्रयत्न करा.
धूम्रपान व मद्यपान करणे टाळा
रक्तदान करण्यापूर्वी किमान 24 तास आधी मद्यपान करू नये. तसेच, कमीतकमी 2 तास आधी धूम्रपान थांबविण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुमच्या रक्ताच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
रिकाम्या पोटी कधीही रक्तदान करू नये
चुकूनही रिकाम्या पोटी रक्तदान करण्याची चूक करू नये. यामुळे रक्तदान केल्यावर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो तसेच चक्कर येणे देखील होऊ शकते. म्हणूनच रक्तदान करण्यापूर्वी आहार घेणे आवश्यक आहे.