Women Health Tips : मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होत असल्यास व्हा सावध, असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण
प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यात मासिक पाळी आणि नंतर मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती या प्रक्रियेतून जाते. परंतु अनेक वेळा काही महिलांना रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव होण्याची समस्या सुरू होते. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
नवी दिल्ली : प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मासिक पाळी (menstruation) खूप महत्त्वाची असते. ही एक प्रक्रिया आहे ज्यातून प्रत्येक स्त्री जाते. पण मासिक पाळीप्रमाणेच स्त्रियांच्या आयुष्यात मेनोपॉजला (menopause) म्हणजेच रजोनिवृत्तीलाही खूप महत्त्व असते. रजोनिवृत्ती ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये स्त्रियांमध्ये मासिक पाळीची प्रक्रिया थांबते. ही परिस्थिती 45 ते 50 वर्षे या वयाच्या महिलांच्या आयुष्यात येते. रजोनिवृत्ती दरम्यान, स्त्रीच्या शरीरातील प्रजनन हार्मोन्सची (hormones) पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे मासिक पाळी थांबते. पण अनेक वेळा असे घडते की मासिक पाळी बंद झाल्यानंतरही अनेक महिलांना अचानक रक्तस्त्राव (bleeding) होण्यास सुरुवात होते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर ते अजिबात सहजपण घेऊ नका, कारण रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे हे काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
एंडोमेट्रिअल हायपरप्लासिया
जर तुम्हाला मेनोपॉजनंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळानंतर अचानक रक्तस्त्राव सुरू झाला तर ते एंडोमेट्रिअल हायपरप्लासियाचे लक्षण असू शकते. खरंतर, ज्या स्त्रियांमध्ये एंडोमेट्रिअम खूप जाड होते, त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. साधारणपणे, जेव्हा प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते आणि इस्ट्रोजेन वाढते, तेव्हा हा रोग स्त्रियांमध्ये होतो. ही एक गंभीर समस्या आहे, ज्यावर वेळेत उपचार करणे फार महत्वाचे आहे, कारण या समस्येमुळे भविष्यात कॅन्सर होऊ शकतो.
एंडोमेट्रिअल कॅन्सर
मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होणे हे एंडोमेट्रिअल कॅन्सरचे लक्षण देखील असू शकते. एंडोमेट्रिअल कॅन्सरला गर्भाशयाचा कॅन्सर असेही म्हणतात. हा प्रजनन कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार आहे. अशा परिस्थितीत मेनोपॉजनंतर तुम्हालाही अचानक रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
सर्व्हायकल कॅन्सर
सर्व्हायकल कॅन्सर हा स्त्रियांमध्ये आढळणारा एक सामान्य कॅन्सर आहे. हा एक गंभीर प्रकारचा कॅन्सर आहे, जो महिलांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरतो. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. पण, हे फार कमी प्रकरणांमध्ये दिसून येते. परंतु जर तुम्हाला असामान्य पद्धतीने रक्तस्त्राव होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव रोखण्याचे मार्ग
मेनोपॉजनंतर अचानक रक्तस्त्राव होण्याची समस्या सुरू झाली असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या संदर्भात, तुम्ही ताबडतोब स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधावा. हे कोणत्याही कॅन्सरचे लक्षण असेल तर वेळीच योग्य उपचार करून तो बरा होऊ शकतो. पण तसं नसेल व एखद्या संसर्गामुळे असे होत असेल, तर त्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने संसर्ग बरा करण्यासाठी औषधं घेऊ शकता. परंतु योग्य उपचारांसाठी, प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे.