वेगाने चाला रे बाबांनो… संशोधनातून बरंच काही आढळून आलंय; तुम्हालाही माहीत हवंच
जपानमधील अभ्यासानुसार, तीव्र गतीने चालणे आरोग्यासाठी दुप्पट फायदेशीर आहे. 25,000 लोकांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तीव्र गतीने चालणारे लोक हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करतात. मधुमेहाचा धोका 30 टक्क्यांपर्यंत कमी होतो, तर वाईट कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहते. तीव्र चालणे शारीरिक क्षमता वाढवते आणि दाह कमी करते. जाड्या लोकांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.
आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि दीर्घायुष मिळण्यासाठी लोक आता शरीराची काळजी घेताना दिसत आहेत. वेळच्या वेळी औषधं घेणं, व्यायाम करणं, योगा, मेडिटेशन करणं आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आहारावरही नियंत्रण ठेवत आहेत. पण अनेक जण यातील सर्वात सोपी पद्धतीवर भर देत आहेत. ती म्हणजे चालणे. सकाळी रोज चालण्याचा आनंद लोक घेत असतात. सकाळ आणि संध्याकाळी चालण्यावर भर देऊन लोक निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लोकांनी फास्ट चालणं अधिक फायदेशीर ठरतं की कमी वेगाने चालणं उपयुक्त असतं यावरही आता चर्चा सुरू आहे. त्यावर काही अभ्यास समोर आले आहेत.
एका अभ्यासातून ही गोष्ट पुढे आली आहे. तुम्ही जर वेगाने चालत असाल तर तुमच्या आरोग्याला त्याचा दुप्पट फायदा होतो. वेगाने चालणाऱ्या लोकांमध्ये आजाराचं प्रमाण कमी असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासात लोकांच्या चालण्याच्या गतीचे परीक्षण करण्यात आले आणि त्यातून ही माहिती समोर आली.
मधुमेहाचा धोका कमी
जपानमधील डोशीशा विद्यापीठात स्थूलपण आणि अतिरिक्त चरबी असलेल्या 25,000 लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात लोकांना त्यांची चालण्याची गती आणि वय याबद्दल विचारण्यात आले. या आधारावर केलेल्या अभ्यासातून असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जे लोक वेगाने चालतात, त्यांना हृदयविकार, मधुमेह यांसारख्या रोगांचा धोका खूप कमी असतो, असं हा अभ्यास सांगतो.
उच्च रक्तदाब आणि…
“सायंटिफिक रिपोर्ट्स” या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात चालण्याच्या गतीचा आणि आरोग्याचा संबंध तपासला गेला आहे. वेगाने चालणाऱ्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका 30 टक्के कमी असतो. त्याशिवाय, वेगाने चालल्याने उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया, म्हणजेच रक्तात असलेल्या वाईट कोलेस्टेरॉलची मात्रा देखील कमी होते, असंही या अभ्यासात म्हटले आहे. वेगाने चालल्यामुळे कार्डियोरेस्पिरेटरी फिटनेस, म्हणजेच शारीरिक हालचालींच्या वेळी पेशींच्या माइटोकॉन्ड्रियाला ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता वाढते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दाहकता कमी होते. डोशीशा विद्यापीठाच्या स्वास्थ्य आणि क्रीडा विज्ञान विभागाचे प्राध्यापक कोजीरो इशी या अभ्यासाचे प्रमुख संशोधक होते.
स्थूलपणाला ग्रस्त असलेल्या लोकांना मेटाबोलिक रोगांचा धोका अधिक असतो, असे प्राध्यापक कोजीरो इशी यांनी सांगितले. वेगाने चालणारे लोक उच्च रक्तदाब, मधुमेह, डिस्लिपिडेमिया, म्हणजेच रक्तातील वाईट चरबीचे प्रमाण कमी करू शकतात आणि जाडपणामुळे ग्रस्त लोकांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते, असेही ते म्हणाले.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)