जगात प्रथमच 7 मिनिटांत होणार कॅन्सरवर उपचार, पाहा कुठे सुरु झाली सुरुवात
एरव्ही कॅन्सर रुग्णांवर सरळ ड्रीपच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांच्या नसांमध्ये इंजेक्शन दिले जात होते. या प्रक्रियेला खुपच वेळ लागत असायचा नव्या उपचारात केवळ सात मिनिटे लागणार आहेत.
नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातील उपचार हे महागडे आणि वेळखाऊ असतात. आता कॅन्सर आजारावर उपचाराचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ब्रिटन हा देश जगातला पहिला देश आहे जो त्यांच्या देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांवर सात मिनिटांत उपचार करणार आहे. ब्रिटनची सरकारी आरोग्य सेवा त्यांच्या देशातील कॅन्सरग्रस्त शेकडो रुग्णांचा उपचाराचा अवधी कमी करणार आहे. या नव्या तंत्रामुळे उपचाराचा वेळ तीन चतुर्थांशांपर्यंत कमी होणार आहे.
ब्रिटीश मेडीसिन्स एण्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीकडून ( MHRA ) मंजूरी मिळताच ब्रिटनची सरकारी राष्ट्रीय आरोग्य सेवेने मंगळवारी कॅन्सरवरील नव्या उपचाराबद्दल माहीती दिली आहे. आतापर्यंत ज्या शेकडो कॅन्सर रुग्णांचा इलाज इम्युनोथेरपीने होत होता. त्यांना आता त्वचेच्या खाली एटेजोलिजुमॅबचे इंजेक्शन देण्याची तयारी केली आहे. यामुळे कॅन्सरच्या उपचाराचा वेळ कमी होणार आहे.
ब्रिटनची सरकारी राष्ट्रीय आरोग्य सेवेने म्हटले की एटेजोलिजुमॅब ज्याला टेकेंट्रिक देखील म्हटले जाते. एरव्ही कॅन्सर रुग्णांवर सरळ ड्रीपच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांच्या नसांमध्ये इंजेक्शन दिले जात होते. या प्रक्रियेला सुमारे 30 मिनिटे वा एक तासांचा वेळ लागत असतो. काही रुग्णांना त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. नसांमध्ये हे औषध पोहचणे अवघड असते. आता नव्या तंत्रज्ञानात औषध त्वचेत इंजेक्ट करुन दिले जाईल. ब्रिटन हा असा प्रयोग करणारा पहीला देश ठरणार आहे. टेकेंट्रिक एक मोनोक्लोनल एंटीबॉडी असून कॅन्सर रुग्णांच्या शरीरातील प्रतिसंरक्षक प्रणालीला मजबूत करते.
आधी 30 ते 60 मिनिटे लागायची
वेस्ट सफोल्क एनएचएस फाऊंडेशन ट्रस्टचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अलेक्झांडर मार्टीन यांनी सांगितले की या नव्या तंत्राने केवळ रुग्णांवर जलद उपचार मिळतील असेच नव्हेत त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी करायला डॉक्टरांना वेळ मिळेल. रोशे प्रोडक्ट्स लिमिटेडचे मेडीकल डायरेक्टर मारियस शोल्ट्ज यांनी सांगितले की या नव्या पद्धतीत केवळ सात मिनिटे लागतात, या आधीच्या ड्रीप उपचारात 30 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो. एटेजोलिजुमाब रोश कंपनी जेनेटिकची प्रमुख औषध आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध असून रुग्णांच्या संरक्षकप्रणालीला कॅन्सरग्रस्त पेशी शोधणे आणि नष्ट करण्यास मदत करते. याचा वापर सध्या फुप्फुस, स्तन, यकृत आणि मुत्राशयाच्या कॅन्सरमध्ये त्याचा वापर होतो.